न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रावेत (दि. १८ ऑक्टोबर २०२५) :- रावेत येथील इस्कॉनच्या श्रीकृष्ण मंदिरात प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या १३० विशेष पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा पार पडला. निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय चव्हाण व रावेत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल टोरपे यांच्या हस्ते सर्व विशेष पोलीस अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) रावेतचे प्रमुख गौरांग दास प्रभु, व्यवस्थापक जयप्रकाश भामरे, प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. विजयकुमार पाटील, विभागाध्यक्ष विशाल शेवाळे, महिला विभाग प्रमुख गौरी सरोदे, तसेच ललिता भारंबे, जागृती वायकोळे, अर्चना भालेराव, राम सुर्वे, राजेंद्र कुंवर, तेजस सकट, अमोल कानू आदी मान्यवर उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक संजय चव्हाण म्हणाले, “श्रीकृष्ण जन्माष्टमी असो की जगन्नाथ रथयात्रा, रावेतमधील श्रीकृष्ण मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. अशा वेळी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे विशेष पोलीस अधिकारी पोलीस प्रशासनाला बंदोबस्त आणि गर्दी नियंत्रणासाठी मोलाचे सहकार्य करतात. त्यांच्या या समर्पित सेवेसाठी आज त्यांचा सन्मान करण्यात आला.”
प्रमुख गौरांग दास प्रभुजी म्हणाले, “प्रत्येक धार्मिक उत्सवात ‘पीएनएसकेएस’ संस्थेचे अधिकारी कोणतीही अपेक्षा न ठेवता निरपेक्ष भावनेने वर्षभर सेवा देतात. त्यामुळे सर्व कार्यक्रम सुरक्षित आणि आनंददायीरीत्या पार पडतात.”
रावेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे यांनी सर्व सन्मानित एसपीओंना शुभेच्छा दिल्या, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयप्रकाश भामरे यांनी केले.