- राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय..
- आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १८ ऑक्टोबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड शहरासाठी हक्काच्या तहसील कार्यालयाच्या जागेचा प्रश्न अखेर सुटला आहे. टाळगाव चिखली येथील ५ एकर जागा पिंपरी-चिंचवड अपर तहसील कार्यालयासाठी उपलब्ध करून देण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. राज्याचे महसूल नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले असून, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेतला आहे.
सुमारे ३५ लाख लोकसंख्या असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात तहसील कार्यालयाच्या कायमस्वरूपी जागेचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. कार्यालय तात्पुरत्या ठिकाणी स्थलांतरित करून चालवावे लागत होते. नागरिकांना सुसज्ज व एकाच ठिकाणी सर्व नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने भाजप आमदार महेश लांडगे यांनी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला. त्याला आता यश मिळाले आहे.
या प्रस्तावावर पुणे जिल्हाधिकारी कार्यालय व विभागीय आयुक्त कार्यालयाने सकारात्मक अहवाल सादर केला होता. त्यानुसार चिखली येथील सर्वे क्रमांक ५३९ मधील ५ एकर जमीन तहसील कार्यालयासाठी देण्यास मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रानुसार, शासनमान्य प्रकल्पांसाठी आवश्यक शासकीय जमीन जिल्हाधिकारी महसूलमुक्त व सारामाफीने संबंधित विभागास देऊ शकतात, या तरतुदीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
या ठिकाणी सुसज्ज तहसील कार्यालय, अधिकारी निवासस्थान, तसेच नागरी सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना प्रशासकीय सेवा सुलभ व कार्यक्षम पद्धतीने मिळणार आहेत.
आमदार महेश लांडगे म्हणाले,
“पिंपरी-चिंचवडकरांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळाला आहे. टाळगाव चिखली येथे तहसील कार्यालयासाठी हक्काची ५ एकर जागा उपलब्ध झाल्यामुळे आता नागरिकांना सुसज्ज व कार्यक्षम सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयासाठी मी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनःपूर्वक आभार मानतो. पिंपरी-चिंचवड शहराची वाटचाल शाश्वत विकासाच्या दिशेने सुरू आहे, याचे समाधान वाटते.”
या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांना अखेर आपलेच ‘हक्काचे तहसील कार्यालय’ मिळणार आहे.