न्यूज पीसीएमसी नेटवर्क
सातारा (दि. १ जून २०१९) :- सातार्यात उद्योजकाला व्यवसाय वृद्धीसाठी कर्जाची आवश्यकता असल्याने १२५ कोटी रुपयांचे कर्ज देतो असे सांगून एकाने ८० लाख रुपये घेतले. कर्ज मिळेना व दिलेली रक्कमही परत मिळत नसल्याने अखेर त्या उद्योजकाने सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना माहिती दिल्यानंतर फसवणुकीचा आकडा ऐकून पोलिसही हडबडले. दरम्यान, बेंगलोर, वेळे (ता. वाई) व मुंबई येथील एकूण तिघांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
श्रीनिवास सत्यनारायण मधीनिधी (रा. बेंगलोर), अजित गायकवाड (रा.वेळे, ता. वाई) व बिलाल मोमीन (रा. मुंबई) या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी प्रसन्न आनंदराव देशमुख (रा. कामाठीपुरा, सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहेे. तक्रारदार प्रसन्न देशमुख यांची सातारा एमआयडीसी येथे युटोपिया एनर्जी नावाची कंपनी आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, तक्रारदार प्रसन्न देशमुख हे २०१५ मध्ये मुंबई येथे कामानिमित्त गेल्यानंतर त्यांची अजित गायकवाड याच्याशी ओळख झाली. ओळख झाल्यानंतर ते पुढेही संपर्कात राहिले. चर्चेदरम्यान तक्रारदार यांना कर्जाची आवश्यकता होती. कंपनीसाठी कर्ज पाहिजे असल्यास आपण मला सांगा मी तुम्हाला कर्ज मिळवून देईन असे, गायकवाड याने देशमुख यांना सांगितले होते. त्यासाठी देशमुख यांना मुंबई येथे बोलावून घेतले व हॉटेल ओबेरॉय येथे श्रीनिवास मधीनिधी यांची कर्जासाठी ओळख करून दिली.
मुंबईमध्ये तिघांची भेट झाल्यानंतर १२५ कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देतो, असे सांगून श्रीनिवास मधीनिधी यांनी देशमुख यांचा विश्वास संपादन केला. ई-मेलद्वारे कागदपत्रे, फॉर्म पाठवून तो भरून घेतला. कागदपत्रे पाहिल्यानंतर ते सातार्यातील कंपनी पाहण्यासाठी येतो. त्यानुसार कंपनी पाहिल्यानंतर परकीय गुंतवणूकदार मिळवून देतो, असे मधीनिधी यांनी सांगितले. काही दिवस गेल्यानंतर परकीय गुंतवणूकदारप्रकरणी अमेरिकेची कंपनी तयार असल्याचे सांगितले. या माध्यमातून १२५ कोटी रुपये मिळण्यास मदत होणार असल्याने प्रसन्न देशमुख यांनी त्याला होकार दिला.
सर्व प्रोसिजर झाल्यानंतर करारापोटी ८० लाख रुपये लागणार असल्याचे मधीनिधी यांनी देशमुख यांना सांगितले. ही प्रक्रिया वेळेत न केल्यास कर्ज व इतर फायदे मिळणार नसल्याचे त्यांनी सांगितले. पैशांची जुळवाजुळव करुन संबंधित ८० लाख रुपये तक्रारदार प्रसन्न देशमुख यांनी बिलाल मोमीन यांच्या हसीना एन्टरप्रायझेसच्या खात्यावर पैसे पाठवले.
पैसे पाठवल्यानंतर मात्र पैसे व कर्ज मिळत नसल्याने देशमुख यांनी मधीनिधी यांच्याकडे तगादा लावला. काही दिवसानंतर उडवाउडवीची उत्तरे येवू लागली. फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तक्रारदार प्रसन्न देशमुख यांनी शहर पोलिस ठाण्यात तिघांविरुध्द फसवणुकीची तक्रार दिली.