न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आरक्षण सोडत प्रक्रिया आज चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे संपन्न झाली. राज्य निवडणूक आयोगाने या आरक्षण सोडतीच्या कामासाठी पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या नियंत्रणाखाली सदर आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्ण झाली.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, तृप्ती सांडभोर, यांच्यासह महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे,सह आयुक्त मनोज लोणकर, सहायक नगर रचनाकार प्रशांत शिंपी, नगरसचिव मुकेश कोळप, सह शहर अभियंता अनिल भालसाकळे, बापू गायकवाड, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे, निवडणूक विभाग उपायुक्त सचिन पवार, अण्णा बोदडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह निवडणूक विभागातील रमेश डाळिंबे,सुनिल राठोड तसेच कामासाठी नियुक्त करण्यात आलेले महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी सुरूवातीला राज्य निवडणूक आयोगाची आरक्षण सोडतीसाठी असणारी नियमावली सांगितली. त्यानंतर निवडणूक आरक्षण सोडत प्रक्रिया चार टप्प्यात संपन्न झाली.
यामध्ये पहिल्या टप्प्यात अनुसूचित जाती प्रवर्ग महिलांकरिता राखीव असणाऱ्या जागांसाठी सोडत शाळकरी विद्यार्थ्यांच्या हस्ते काढण्यात आली. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात अनुसूचित जमाती प्रवर्ग महिलांकरिता राखीव असणाऱ्या जागांसाठी सोडत काढण्यात आली.
आरक्षण सोडत प्रक्रियेच्या तिसऱ्या टप्प्यात नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग सोडत प्रक्रिया पार पडली. त्यानंतर सर्वसाधारण महिलांच्या जागा निश्चित करण्याकरिता प्रक्रिया पूर्ण करून प्रभागनिहाय आरक्षित जागा जाहीर करण्यात आल्या.
आरक्षण कामकाजाचे प्रास्ताविक उपायुक्त सचिन पवार यांनी तर सूत्रसंचालन उपायुक्त अण्णा बोदडे यांनी केले.











