- हरित सेतू, सायकल मार्ग, पादचारी सुविधा आणि ग्रीन बॉण्ड उपक्रमांना राष्ट्रीय स्तरावर दाद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिकेने शाश्वत, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक शहरी वाहतूक व्यवस्थेसाठी राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाकडून “शहरी वाहतूक उत्कृष्टता पुरस्कार” महापालिकेला प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथे झालेल्या अर्बन मोबिलिटी परिषदेत केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
महापालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, सहशहर अभियंता बापू गायकवाड आणि अन्य अधिकाऱ्यांनी हा सन्मान स्वीकारला. “सर्वाधिक नाविन्यपूर्ण वित्तीय यंत्रणा असलेले शहर” या श्रेणीत महापालिका देशातील अव्वल ठरली.
देशातील पहिले ग्रीन बॉण्ड जारी करून महापालिकेने २०० कोटी रुपये उभारले असून, या निधीतून हरित सेतू आणि टेल्को रोड पुनर्विकास प्रकल्प राबवले जात आहेत. सुरक्षित पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक, शाळा क्षेत्र सुरक्षा, सायकल पार्किंग, वृक्षलागवड आणि पाणी पुनर्भरण अशा सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध होत आहेत.
या प्रकल्पांमुळे शहरात चालण्याचे आणि सायकल वापरण्याचे प्रमाण वाढत असून, पिंपरी चिंचवड देशात शाश्वत वाहतुकीचे आदर्श मॉडेल म्हणून झळकत आहे.












