- डिव्हायडर हटवा; अन्यथा आमदार-खासदारांच्या घरावर मोर्चा नेण्याचा डॉ. बाबा कांबळेंचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १० नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्यालयासमोर मोरवाडी चौकातील “अशास्त्रीय आणि भ्रष्टाचारग्रस्त काँक्रिट डिव्हायडर”विरोधात रिक्षा-टॅक्सी चालकांनी आज जोरदार एल्गार आंदोलन केले. महाराष्ट्र रिक्षा पंचायत कष्टकरी जनता आघाडी व ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ठिय्या आंदोलनात मोठ्या संख्येने चालक, नागरिक व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
आंदोलकांनी “चुकीचे डिव्हायडर हटवा”, “जनतेच्या जीवाशी खेळ बंद करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. डॉ. कांबळे यांनी सात प्रमुख मागण्यांचे निवेदन मनपा आयुक्तांच्या नावे दिले. संबंधित अधिकारी अभिमन्यू भोसले यांनी येऊन निवेदन स्विकारत डिव्हायडर हटवण्याबाबत आश्वासन दिले.
या डिव्हायडरमुळे वाहतूक कोंडी, अपघात आणि आर्थिक अनियमितता वाढल्याचा आरोप करून डॉ. कांबळे यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली. भविष्यातील प्रकल्पांत जनसहभाग बंधनकारक करावा तसेच स्वतंत्र वाहतूक तज्ज्ञ समिती नेमावी, अशीही मागणी त्यांनी मांडली.
प्रशासनाने प्रतिसाद दिला नाही तर आमदार-खासदारांच्या घरावर मोर्चा नेऊ, असा इशारा देत डॉ. कांबळे यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इरादा व्यक्त केला.












