- गांधीनगर–खराळवाडीतील सर्वपक्षीय बैठकीत ठराव..
- बाहेरील उमेदवारांना विरोध करण्याचा निर्णय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० नोव्हेंबर २०२५) :- महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ (गांधीनगर–खराळवाडी, अनुसूचित जाती राखीव) मधील सर्वपक्षीय इच्छुकांची तातडीची बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भीमसृष्टी, पिंपरी चौक येथे पार पडली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बैठकीची सुरुवात करण्यात आली. प्रभागातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेत आगामी निवडणुकीसाठी धोरणात्मक चर्चा करण्यात आली.
गेल्या १८ वर्षांपासून प्रभागाला स्थानिक नगरसेवक मिळालेला नसल्याने आगामी निवडणुकीत स्थानिक उम्मीदवारालाच संधी मिळावी, अशी तीव्र भावना उपस्थितांमध्ये व्यक्त झाली. अनुसूचित जाती राखीव प्रभागातून यावेळी स्थानिक नेतृत्वाला पुढे आणण्याची संधी मिळत असल्याचे सर्व इच्छुकांनी आपल्या मनोगतातून सांगितले.
विविध पक्षांतील इच्छुकांनी आपल्या पक्षांकडे तिकीट मागणी तीव्र करण्याचे ठरवले. प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी स्थानिक प्रतिनिधींची गरज असल्याचे एकमुखी मत बैठकीत नोंदवले गेले. बैठकीत घेतलेल्या महत्त्वाच्या ठरावानुसार — कोणत्याही पक्षाने स्थानिक व्यक्तीलाच तिकीट द्यावे; बाहेरील उमेदवाराला तिकीट दिल्यास त्या उमेदवाराला मतदान न करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.
प्रभागातील एकता टिकवणे, बाहेरील उमेदवारांवरील अवलंबित्व कमी करणे आणि परिसराच्या विकासाला न्याय देणारे स्थानिक नेतृत्व निर्माण करणे हेच सर्वांचे प्रमुख ध्येय असल्याचे स्पष्ट करण्यात आले. निवडणुकीत कोणत्याही प्रकारचे आमिष, धनदंड, दबाव किंवा मतदारांना फितूर करण्याचे प्रयत्न झाल्यास संबंधित पक्ष किंवा व्यक्तीविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्याचे निर्देशही देण्यात आले. स्वच्छ आणि प्रामाणिक निवडणूक प्रक्रियेची शपथही उपस्थितांनी घेतली.
या सर्वपक्षीय बैठकीस अॅड. बी. के. कांबळे, अॅड. उमेश खंदारे, अॅड. दत्ता झुळूक, अॅड. धम्मराज साळवे, दिलीप साळवे, कष्टकरी नेते बाबा कांबळे, अजीज शेख, प्रल्हाद कांबळे, राजेंद्र साळवे (वंचित बहुजन आघाडी), चंद्रकांत बोचकुरे, अजय शेरखाने, दीपक म्हेत्रे, गिरीश साबळे, निलेश काळे यांसह अनेक इच्छुक उमेदवार उपस्थित होते.
तसेच लक्ष्मण कांबळे, हिराचंद जाधव, गणेश साळुंखे, धम्मा आचलखांब, सम्राट गायकवाड, राजन गुंजाळ, मनोज गजभार (लेणी संवर्धक) व रवि कांबळे यांसारख्या ज्येष्ठ मार्गदर्शकांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.











