- गेटपासशिवाय नागरिकांनाही प्रवेश नाही; नियमभंग करणाऱ्या सुरक्षारक्षकांवर कारवाईची तयारी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २० नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेत सुरक्षेच्या दृष्टीने कठोर निर्णय घेतला असून, महापालिका भवनासह सर्व क्षेत्रीय कार्यालयांत अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना ओळखपत्राशिवाय प्रवेश देण्यास बंदी घालण्यात आली आहे. अचानक तपासणीदरम्यान अनेक सुरक्षारक्षक ओळखपत्र न तपासता प्रवेश देत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने तातडीने नवीन नियमावली लागू केली आहे.
महापालिकेच्या ८ क्षेत्रीय कार्यालयांसह इतर विभागांमध्ये एकूण दहा हजारांहून अधिक कर्मचारी विविध पदांवर कार्यरत आहेत. या पार्श्वभूमीवर उपस्थिती, वेळेवर हजेरी आणि शिस्त पाळली जात आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. जागेवर गैरहजर असणे, कामाच्या वेळेत विनाकारण बाहेर फिरणे किंवा उशिरा हजेरी लावणे अशा बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.
मुख्यालयात येणाऱ्या अभ्यागतांनाही आता गेटपास अनिवार्य करण्यात आला असून, ये-जा रजिस्टरमध्ये नोंद घेऊनच प्रवेश दिला जात आहे. हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांना महापालिका भवनात प्रवेश दिला जाणार नाही, असा नियमही लागू करण्यात आला आहे.
महापालिकेचे सहआयुक्त मनोज लोणकर यांनी सांगितले की, “सुरक्षा विभागास नियमानुसार काटेकोर तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा किंवा नियमभंग आढळल्यास संबंधित सुरक्षारक्षक, पर्यवेक्षक आणि विभागावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.”
नवीन नियमांनुसार…
- अधिकारी, मानधन व ठेकेदार संस्थेचे कर्मचारी ओळखपत्राशिवाय कार्यालयात प्रवेश करू शकणार नाहीत.
- नागरिकांना तपासणीनंतरच गेटपास दिला जाईल.
- मेट्रोने प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या वाहनांना महापालिका परिसरात पार्किंगस परवानगी नाही.
- पार्किंग फक्त अधिकारी, पदाधिकारी आणि कामानिमित्त आलेल्या नागरिकांसाठी राखीव.
- सायंकाळी ६.१५ नंतर नागरिकांना प्रवेशबंदी.
सुरक्षेला प्राधान्य देत महापालिकेने ही कडक नियमावली लागू केली असून, येत्या काळात तपासणी आणखी कठोर करण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.












