- “प्रभागनिहाय विभाजनातील गंभीर त्रुटींमुळे हजारो मतदार वाऱ्यावर”..
- शहर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निवडणूक विभागाची खेळी उघडकीस..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. 23 नोव्हेंबर 2025) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये गंभीर अनियमितता, चुकीचे विभाजन आणि मोठ्या प्रमाणावरील गोंधळ झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्य निवडणूक आयोगाकडे तातडीचे निवेदन सादर केले आहे. हजारो मतदार चुकीच्या प्रभागात पाठवले गेल्याने हरकती दाखल करण्यासाठी नागरिक त्रस्त झाले आहेत, अशी माहिती नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले की, 16 जुलै 2025 च्या आयोगाच्या आदेशानुसार स्थळ पाहणी करूनच विभाजन करणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात कोणतीही पडताळणी न करता पूर्ण वस्त्या व परिसर चुकीच्या प्रभागात टाकले गेले. अनेक प्रभागांत 5 हजारांहून अधिक मतदारांचा घोळ झाल्याचा दावा करण्यात आला.
ऑनलाइन शोध सुविधा, PDF याद्यांमध्ये सर्च ऑप्शन, मतदारांचे फोटो नसणे, दुबार-तिबार नावे न वगळणे, नागरिकांना मदत केंद्रांचा अभाव अशा अनेक त्रुटींवर पक्षाने नाराजी व्यक्त केली. सुमारे 1 लाखांपेक्षा जास्त दुबार नावे असूनही कार्यवाही न झाल्याचेही सांगण्यात आले.
पक्षाने आयोगाकडे तातडीने ९ प्रमुख उपाययोजना अमलात आणण्याची मागणी केली आहे — त्यात सर्च सुविधा सुरू करणे, स्थळ पाहणी करून Suo-Moto दुरुस्ती, हरकतींची मुदत वाढवणे, ऑनलाइन हरकतीचा पर्याय, विशेष मदत केंद्रे सुरू करणे, तसेच दुबार नावांवरील कडक कार्यवाही यांचा समावेश आहे.
पत्रकार परिषदेस शहर समन्वयक विलास लांडे, शहराध्यक्ष योगेश बहल, प्रवक्ते अजित गव्हाणे, मंगलाताई कदम, भाऊसाहेब भोईर, प्रशांत शितोळे, मोरेश्वर भोंडवे, फजल शेख, उल्हास शेट्टी, पंकज भालेकर, श्रीधर वाल्हेकर व विनायक रणसुभे उपस्थित होते.











