- पक्षाने आमच्यावर ठेवलेला विश्वास सार्थ करू – संदीप काटे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. 23 नोव्हेंबर 2025) :- पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा शनिवारी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पार पडला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या या मेळाव्यात पिंपळे सौदागर येथील प्रसिद्ध उद्योजक संदीप काटे आणि सामाजिक कार्यकर्त्या अनिताताई संदीप काटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांना नियुक्तीपत्रे देऊन त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.
मेळाव्याला प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, पश्चिम महाराष्ट्र विभागीय संघटन मंत्री मकरंद देशपांडे, आमदार महेश लांडगे, निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप, निवडणूक संचालन समितीचे संयोजक आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनी जगताप, संघटन सरचिटणीस अॅड. मोरेश्वर शेडगे तसेच माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, उषा ढोरे, प्रदेश सदस्य सदाशिव खाडे, पक्षाचे नगरसेवक-नगरसेविका, महिला पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्साहाचे स्वरूप दिले.
उद्योजक संदीप काटे आणि सामाजिक कार्यकर्त्या अनिताताई संदीप काटे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, “भारतीय जनता पक्षात प्रवेश करणे हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि उत्साहाचा क्षण आहे. पिंपळे सौदागर प्रभाग क्रमांक 28 मध्ये आम्ही सामाजिक पातळीवर अनेक वर्षे कार्य केले आहे. आता संघटनेच्या माध्यमातून हे काम अधिक व्यापक स्तरावर, संघटितपणे आणि सक्षम नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली करण्याची संधी भाजपने दिली आहे. पक्षाची विकासनीती, कार्यकर्त्यांना मिळणारा मान आणि शहरासाठी घेतलेली ठोस भूमिका आमच्या विश्वासाला अधिक बळ देते. भाजपने केलेल्या विकासकामांची उपयुक्त अशी माहिती प्रभागातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न असेल. पक्षाने आमच्यावर ठेवलेला विश्वास जपत आम्ही प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करू.”










