- प्रभाग १६ आणि १७ मधील मतदारांचे उलटसुलट बदल..
- उमेदवारांचे गणित कोलमडले, नागरिक संतप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. 25 नोव्हेंबर 2025) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रशासनाने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीने रावेत (प्रभाग १६) आणि चिंचवडेनगर-वाल्हेकरवाडी (प्रभाग १७) या दोन्ही प्रभागांत प्रचंड गोंधळ उडवून दिला आहे. एका प्रभागातील हजारो मतदार दुसऱ्याच प्रभागात दिसू लागल्याने दोन्ही भागांत संभ्रमाचे आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रारूप यादीचे परीक्षण करताना रावेत प्रभाग १६ मधील तब्बल ४ हजारांहून अधिक मतदारांची नावे चुकीने प्रभाग १७ मध्ये टाकल्याचे उघड झाले. यात अनेक सोसायट्या, चाळी आणि मुख्य रस्त्यांवरील रहिवासी मोठ्या प्रमाणावर आहेत. तर उलट्या दिशेने वाल्हेकरवाडीतील २ हजारांहून अधिक मतदारांची नावे रावेत प्रभागात दिसून येत आहेत.
या गंभीर तफावतींमुळे स्थानिक नागरिक, सोसायट्या, वसाहती आणि विविध हाउसिंग संस्थांनी प्रशासनाकडे तक्रारींचा वर्षाव केला आहे. काही भागांत तर संपूर्ण सोसायट्यांचे मतदार नावासकट दुसऱ्याच प्रभागात हलवण्यात आल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत.
या गोंधळामुळे दोन्ही प्रभागांत उमेदवारांचे राजकीय गणित ढवळून निघाले आहे. मतदारसंख्या अचानक बदलल्याने काहींचा भक्कम मतदारवर्ग तुटल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे माजी नगरसेवक, विविध पक्षांचे इच्छुक, स्थानिक पदाधिकारी यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे धाव घेतली असून आक्षेप, सूचना दाखल करण्यासाठी प्रशासन कार्यालयात गर्दी वाढली आहे.
निवडणूक विभागाने नागरिकांना आश्वासन दिले आहे की सर्व आक्षेपांची वेळीच दखल घेऊन २७ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत योग्य दुरुस्त्या केल्या जातील.
रावेत आणि वाल्हेकरवाडी हे वेगाने वाढणारे, घनदाट लोकसंख्येचे प्रभाग असल्याने मतदारसंख्येतील बदल संपूर्ण निवडणूक समीकरण बदलू शकतात. कोणते मतदार कुठे गेले यावरून पक्ष रणनीतीतही बदल होणार आहेत. काही इच्छुकांसाठी ही तफावत नुकसानकारक तर काहींसाठी अनपेक्षित संधी ठरण्याची शक्यता आहे.
एकूणच, प्रारूप यादीतील या मोठ्या गोंधळामुळे रावेत–वाल्हेकरवाडी परिसरात निवडणूकपूर्व अनिश्चितता आणि तणाव वाढला असून आता सर्वांचे लक्ष अंतिम मतदार यादीकडे लागले आहे.










