- शिवस्मारक, स्मशानभूमी, दवाखाना व नदीसुधार या महत्त्वाच्या प्रश्नांवर निवडणूक लढविणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ नोव्हेंबर २०२५) :- वाल्हेकरवाडी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत प्रभाग क्रमांक १७ मधून सुप्रिया भरत वाल्हेकर यांना आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी एकमताने उमेदवार म्हणून जाहीर पाठिंबा देण्यात आला.
बैठकीची सुरुवात भरत शंकर वाल्हेकर यांच्या प्रास्ताविकाने झाली. शिवस्मारक, स्मशानभूमी, दवाखाना व नदीसुधार या चार प्रमुख मुद्द्यांवर आजवरच्या पाठपुराव्यांची कागदपत्रे त्यांनी ग्रामस्थांसमोर सादर केली. त्यावर सकारात्मक चर्चेनंतर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस भूमिका मांडण्यात आल्या.
प्रगतशील शेतकरी विठ्ठल तरुण मंडळाचे अध्यक्ष नथु मारूती वाल्हेकर यांनी सुमारे तीस हजार मतदार असलेल्या वाल्हेकरवाडी परिसरातून सुप्रिया वाल्हेकर यांना निवडून आणण्याचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गडगडाटात मंजूर केला.
बैठकीपूर्वीच ग्रामस्थांमध्ये सुप्रिया वाल्हेकर यांच्या मागील चार-पाच वर्षांतील सामाजिक कार्याबाबत सकारात्मक चर्चा होती. नवरात्र उत्सव, स्वस्त थाळी, रोजगार मेळावा, शिलाई मशीन व संगणक प्रशिक्षण अशा अनेक उपक्रमांद्वारे त्यांनी सातत्याने समाजकार्य केल्याचे उपस्थित ग्रामस्थांनी नमूद केले.
याच पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग १७ सर्वसाधारण महिला गटातून सुप्रिया भरत वाल्हेकर यांची एकमुखाने निवड केली. तसेच सर्वसाधारण गटातून शुभम वाल्हेकर आणि अनुसूचित जाती महिला गटातून भाग्यश्री अक्षय चव्हाण पुष्पाताई शंकर झोंबाडे यांच्या नावांवरही चर्चा झाली.
बैठकीस वाल्हेकरवाडी परिसरातील शेकडो ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. बैठकीचे आयोजन ग्रामस्थांकडून यशस्वीरीत्या पार पडले.










