न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ नोव्हेंबर २०२५) :- निगडी – मुकाई चौक, किवळे परिसर ते वाघोली दरम्यान साधारण 32 किलोमीटर रस्ता ‘फास्ट ट्रॅक कॉरिडॉर” विकसित करण्याचे नियोजन सुरू आहे. याच अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिका आणि पीएमपीएमएल यांच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या निगडी ते मुकाई चौक किवळे बीआरटी कॉरिडॉरवर बससेवा सुरू करण्यात आली आहे. निगडी भक्तीशक्ती चौकापासून ट्रान्सपोर्ट नगर मार्गे मुकाई चौकपर्यंतच्या या नव्या मार्गामुळे नागरिकांना जलद, सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची सुविधा मिळणार असल्याचे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले. आगामी काळात हा परिसर “मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब” म्हणून विकसित करणार असल्याचा विश्वासही जगताप यांनी व्यक्त केला.
पिंपरी चिंचवड परिसर प्रचंड वेगाने वाढत आहे.त्यामुळे येथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी आमदार शंकर जगताप प्रचंड पाठपुरावा करत आहेत. वेळोवेळी प्रशासनाला सूचना देत अनेक बदल केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर वाघोली, औंध, हिंजवडी या भागांमध्ये आयटी उद्योग मोठ्या प्रमाणात असून या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम करण्याचे नियोजन सुरू आहे आहे. या भागांमध्ये जाण्यासाठी पिंपरी चिंचवडमधून मोठ्या प्रमाणात उद्योजक, नोकरदार, विद्यार्थी ये जा करतात. अशा वेळी खाजगी गाड्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आल्यानंतर वाहतुकीवर ताण निर्माण होतो. यासाठी मेट्रो सेवांचे विस्तारीकरण आणि त्यासोबतच पीएमपीएल बसेससाठी समर्पित बीआरटी लेनची “फास्ट ट्रॅक कॉरिडॉर” व्यवस्था व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी आमदार शंकर जगताप यांनी पाठपुरावा केला.
याच अनुषंगाने निगडी ते मुकाई चौक, किवळे बी आर टी हा कॅरिडॉर सुरू करण्यात आला आहे. यामुळे पिंपरी चिंचवड आणि पुणे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या मार्गावरून (कंसात बस क्रमांक) निगडी ते आकुर्डी स्टेशन( 303), निगडी ते गहुंजे (303A), निगडी ते पिंपरी गुरव( 319), निगडी ते हिंजवडी फेज तीन (375), निगडी ते मुकाई चौक( 365)भोसरी ते मुकाई चौक (367) या बस धावणार आहेत.
हे मार्ग सुरू करण्याचे निर्देश
दरम्यान मुकाई चौक ते भक्ती- शक्ती बीआरटी रस्ता वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाला असल्याने शहरातील बंद केलेल्या किवळे ते लोहगाव विमानतळ, किवळे ते स्वारगेट, किवळे ते आळंदी, किवळे ते चाकण एमआयडीसी व देहूरोड ते पिंपरीगाव या मार्गावरील बससेवा तसेच सकाळ-सायंकाळ किवळे ते हिंजवडी फेज-३ या मार्गावर जास्तीत जास्त बसेस सुरु करण्याचे निर्देश पीएमपीएल प्रशासनाला दिले असल्याचे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले.
अंतर्गत भागातील प्रवाशांना मोठा दिलासा
मुकाई चौक – किवळे हे मुंबई बंगळुरू बायपासवरील पिंपरी चिंचवड शहराचे महत्त्वाचे प्रवेशद्वार मानले जाते. मुंबईहून येणाऱ्या एसटी तसेच खाजगी प्रवासी वाहनांचा येथे नियमित थांबा असतो. त्यामुळे शहराच्या अंतर्गत भागात जाणाऱ्या प्रवाशांना या नव्या बससेवेचा मोठा लाभ होणार आहे. इस्कॉन रावेत, निगडी, आकुर्डी, भोसरी आदी परिसरात आता अधिक सुलभ प्रवास सुविधा उपलब्ध होणार आहेत.
निगडी ते मुकाई चौक किवळे या नव्या बीआरटी मार्गावर समर्पित बस लेनच्या व्यवस्थेमुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून प्रवास अधिक सुरळीत होईल असा विश्वास आहे. सुरुवातीला एकूण 16 बसेस या मार्गावर सोडण्याचे नियोजन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे. प्रवासीसंख्या वाढल्यास फेऱ्यांची तसेच बसेसची संख्या वाढवण्याची तयारी पीएमपीएमएलने दर्शवली आहे. ही बीआरटी लेन प्रवाशांसाठी सुरक्षित आणि वेगवान असावी असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. बीआरटी लेनमध्ये खाजगी गाड्यांची घुसखोरी करू नयेत यासाठी ही प्रशासनाला सक्त ताकीद देण्यात आलेली आहे. यापुढील काळात मुकाई चौक किवळे परिसर मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब म्हणून विकसित होणार आहे. तसेच मुकाई चौक ते वाघोलीदरम्यान सुमारे 32 किलोमीटर्सचा “फास्ट ट्रॅक कॉरिडॉर” विकसित करण्याचे नियोजन सुरू आहे.
– शंकर जगताप आमदार, भाजपा पिंपरी चिंचवड शहर









