- मतदार यादीतील गोंधळ, डुप्लिकेट नावे आणि मुस्लिम-एससी मतदारांचे नाव शिफ्ट केल्याचा गंभीर आरोप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेने जाहीर केलेल्या मतदार यादीनंतर मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाल्याचा आरोप करत महाविकास आघाडीने पिंपरी मनपा मुख्यालयासमोर मतदार यादीची होळी करून तीव्र निदर्शने केली. निवडणूक विभागाने तयार केलेल्या याद्यांमध्ये हजारोंच्या संख्येने बनावट नावे असून काही विशिष्ट समाजघटकांच्या मतदारांची नावे जाणीवपूर्वक काढून टाकली किंवा इतर प्रभागांमध्ये हलवली गेल्याचा गंभीर आरोप आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, राकांपा (शरद पवार गट) शहराध्यक्ष तुषार कामठे, डॉ. सुलक्षणा धर-शिलवंत आणि काँग्रेसच्या मनीषा गरुड यांनी केले.
अॅड. चाबुकस्वार यांनी भाजपवर आरोप करताना म्हटले की मुस्लिम व अनुसूचित जाती समाजातील मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात दुसऱ्या प्रभागात हलवण्यात आली आहेत. विधानसभा निवडणुकीतही अशाच प्रकारे मतदार याद्यांमध्ये फेरफार करून मतांची चोरी करण्यात आल्याचे आरोप त्यांनी केले. राहुल गांधी यांनी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर केलेले “वोट चोरी”चे आरोप आता खरे ठरत असल्याचा उल्लेख त्यांनी केला. राज्यभरात मतदारांना शिफ्ट करण्याचे प्रकार घडत असून भाजपला जेथे विरोधी मतदार आहेत त्यांनाच दुसऱ्या प्रभागात टाकण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांनी सांगितले. मतदार यादी दुरुस्त करूनच निवडणुका घ्याव्यात, जेणेकरून खरा निकाल स्पष्ट दिसेल, अशी मागणीही त्यांनी केली.
डॉ. सुलक्षणा धर-शिलवंत यांनी सांगितले की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मतदान करणाऱ्या अनेक कुटुंबांची नावे पालिकेच्या ड्राफ्ट यादीतून गायब आहेत. संत तुकाराम नगर प्रभागातील तब्बल पाच हजारांपेक्षा अधिक मतदारांची नावे वगळण्यात आली किंवा त्यांना दुसऱ्या प्रभागात हलवण्यात आले आहे. मुस्लिम व अनुसूचित जाती समाजातील मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात काढून टाकल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपा “१०० पार”चा नारा देत आहे, परंतु जनतेच्या हिताचे कोणतेही ठोस काम न करताही असा विश्वास कुठून येतो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मतदार यादीतील अन्यायकारक फेरफार पाहूनच आम्ही मतदार यादीची होळी करून निषेध नोंदवला असल्याचे त्यांनी सांगितले.
महाविकास आघाडीच्या या आंदोलनात मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. मतदार यादीतील त्रुटींची तात्काळ आणि पारदर्शक दुरुस्ती करण्याची मागणी आंदोलनादरम्यान जोरदारपणे करण्यात आली.











