- सुलक्षणा धर यांची निवडणूक याचिका फेटाळण्याची मागणी नाकारली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) आमदार अण्णा बनसोडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. निवडणुकीत झालेल्या अनियमिततेच्या आरोपांवर विरोधी उमेदवार सुलक्षणा धर (शरद पवार गट) यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावावी, अशी मागणी बनसोडे यांनी केली होती. मात्र, न्यायालयाने ती मागणी नाकारत याचिकेची सुनावणी कायम ठेवली आहे.
पिंपरी मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत अण्णा बनसोडे यांना १,९३,३३९ मते, तर सुलक्षणा धर यांना ७२,५७५ मते मिळाली होती. निकालानंतर धर यांनी अनियमिततेचे आरोप करत न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली. त्यावर आमदार बनसोडे यांनी ऑर्डर ७ रुल ११ अंतर्गत याचिका बाद करण्याची विनंती केली होती.
न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या समोर झालेल्या सुनावणीत धर यांच्या वतीने वकील स्नेहल धांगे यांनी बाजू मांडली. युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, याचिकेत लोकप्रतिनिधित्व कायदा १९५१ नुसार आवश्यक ते सर्व घटक स्पष्टपणे नमूद आहेत. निवडणूक रद्द करण्यासाठी आवश्यक तथ्ये याचिकेत नमूद असल्याने ती सुरुवातीच्या टप्प्यावर बाद करता येत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
त्यामुळे सुलक्षणा धर यांनी दाखल केलेल्या निवडणूक आव्हान याचिकेची पुढील सुनावणी कायम राहणार असून, बनसोडे यांना यामुळे मोठा कायदेशीर फटका बसल्याचे सांगितले जात आहे.












