न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव (दि. ३० नोव्हेंबर २०२५) :- महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांच्या लेकरांचे मोफत शिक्षण व संगोपन करणाऱ्या स्नेहवन संस्थेचे संस्थापक श्री. अशोक देशमाने सर यांच्या सेवाभावी कार्याबद्दल सृजन फाऊंडेशनच्या वतीने श्री. अशोक देशमाने यांस ‘सृजनसेवा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. जगद्गुरु तुकोबारायांची गाथा, शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र तसेच शाळेच्या अभंग दिवाळी मेळा या उपक्रमातून जमा झालेल्या रक्कमेत भर घालून ५१,००१/- रूपयांचा धनादेश स्नेहवन या संस्थेस देण्यात आला.
सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलने आयोजित केलेल्या ‘सृजनदीप व्याख्यानमालेचा’ समारोप स्नेहवनचे संस्थापक अशोक देशमाने यांना सृजनसेवा पुरस्कार प्रदान करून व त्यांच्या प्रकट मुलाखतीने झाला.
इ. सातवीतील अथर्व उबाळे, आरोही मारणे, वंश संकपाळ आणि अनुष्का मोरे यांनी देशमाने सरांची प्रकट मुलाखत घेतली. स्नेहवन बरोबर
देशमाने सरांचा जीवनप्रवास या मुलाखतीतून उलगडला गेला. आयटी क्षेत्रातील एक सुखकर वाट सोडून शेतकरी बांधवांच्या भयाण वास्तवाने अस्वस्थ होऊन स्नेहवन ची खडतर वाट देशमाने यांनी निवडली. जे आपल्याजवळ आहे, जेवढे आहे, ते दुसऱ्यांना देण्याची वृत्ती घरातील संस्कारांमुळे वाढीस लागली. एका शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यामुळे शेतकरी बांधवांपुढील अनुत्तरित प्रश्नांना देशमाने सरांनी आपल्या कृतीतून उत्तर दिले. समाजातील या शेतकरी बांधवांच्या मुलांच्या शिक्षणाचा भार घेऊन त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने त्यांना सक्षम बनविण्यावर सरांनी भर दिला. स्वावलंबन, शिस्त आणि स्नेह या त्रिसूत्रीवर चालणारी स्नेहवन ही संस्था मुलेच चालवितात.
अभंगाच्या विद्यार्थ्यांनी मुलाखतीमध्ये विचारलेल्या विविध प्रश्नांना अगदी निर्मोही, निलेॅप व निखळपणे आपले उदात्त विचार मांडत देशमाने सरांनी विद्यार्थी व पालकांना बहुमोल मार्गदर्शन केले. शिक्षणाच्या जोडीला व्यावसायिक शिक्षणाचे धडे ही स्नेहवन मध्ये दिले जातात. स्नेहवनचे कामकाज, मुलांची निवड प्रक्रिया, मुलांसाठीचे विविध प्रकल्प, मुलांची दिनचर्या, मुलांचे हट्ट, कुटुंबाची व आपल्या पत्नी अर्चनाताई यांची साथ, आपल्या गावाशी जोडून राहण्याची शिकवण आणि पांडुरंगावर असलेली निस्सीम निष्ठा या सर्व विषयांना हात घालत विद्यार्थ्यांनी ही मुलाखत रंगतदार केली. तसेच देशमाने सरांचा स्नेहवनचा सेवाभावी जीवनप्रवास व शेतकरी बांधवांचे आजचे भयाण वास्तव याप्रसंगी मुलाखतीतून पालकांना व विद्यार्थ्यांना अनुभवण्यास मिळाले. आपल्या जीवनाला एक उदात्त उद्देश असावा, असा उद्देश लाभला की आपले जीवन अर्थपूर्ण होते. हा अनमोल संदेश सरांनी आपल्या मुलाखतीतून दिला.
सृजनदीप व्याख्यानमालेचे अध्यक्ष वाचनवेड संस्थेचे श्री. किरीटी मोरे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. व्याख्यानमालेच्या कार्यक्रमासाठी श्रीक्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल-रखुमाई ट्रस्टचे विश्वस्त हभप शिवाजी महाराज मोरे, वाचनवेड संस्थेचे मयुर शेठ, देहूचे माजी सरपंच श्री मधुकर कंद, प्रा. अनंतराव पवार महाविद्यालय, पिरंगुट येथील प्रा. डॉ. विजय बालघरे, कवीवर्य स्वप्नील चौधरी, मयुरेश्वर ग्रंथालय मोरगांवचे अध्यक्ष श्री. अजित गुंड, सृजन फाउंडेशनचे कायदेशीर सल्लागार ॲड. संजय भसे, उपप्राचार्या शैलजा स्वामी, सृजन फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. सुनिल कंद आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर यांनी केले. सृजन फाऊंडेशनचे सचिव प्रा. विकास कंद यांनी स्नेहवन या संस्थेचा आढावा घेतला. सृजन फाऊंडेशनचे संचालक सौरभ कंद यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. शाळेतील सहशिक्षिका सौ. शितल देवकर यांनी आभारप्रदर्शन केले. सृजनसेवा पुरस्कार प्रदान सोहळ्याचे सूत्रसंचालन व मुलाखतीचे नियोजन सहशिक्षिका सौ. वृषाली आढाव यांनी केले.












