- अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आणली नियंत्रणात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३० नोव्हेंबर २०२५) :- शहरातील भोसरी एमआयडीसी परिसरातील अंबिका पावडर कोटिंग कंपनी मध्ये एलपीजी (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस) अचानक स्फोट होऊन आग लागल्याची घटना शनिवार (२९ नोव्हेंबर) रोजी घडली होती. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. दरम्यान, या घटनेत १ कामगार गंभीर तथा ५ कामगार किरकोळ जखमी झाले असून प्रथमोपचारानंतर पुढील वैद्यकीय उपचाराकरिता रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे.
शनिवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास कंपनीमध्ये अचानक मोठा स्फोट होऊन आग लागली, व स्फोटाच्या मोठ्या आवाजाने तथा आगीच्या उंच ज्वाला तसेच धूर पसरू लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. याबाबतची माहिती परिसरातील नागरिकांनी तातडीने अग्निशमन विभागाला दिली.
घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन केंद्र पिंपरी, नेहरूनगर उप अग्निशमन केंद्र आणि भोसरी उप अग्निशमन केंद्र येथील पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन विभागाच्या पथकाने परिस्थितीचा आढावा घेत जलदगतीने बचावकार्य सुरू केले. धूर आणि उष्णतेमुळे उद्भवणारा पुढील धोका लक्षात घेऊन, पथकाने सर्व जागांची पाहणी करून कंपनीतील कामगारांना सुरक्षित बाहेर काढत परिस्थिती नियंत्रणात आणली.
या कार्यवाहीमध्ये उप अग्निशमन अधिकारी गौतम इंगवले, दिलीप गायकवाड यांच्यासह ३० अग्निशामक जवान सहभागी होते. अग्निशामक पथकांनी एकत्रित समन्वयाने बचाव व अग्निशमन कार्य सुरळीतपणे पाडले. या स्फोटाचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून अग्निशमन विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत १०१ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन अग्निशमन विभागाकडून करण्यात आले आहे.
जखमी कामगारांची नावे
सुनील कुमार( गंभीर जखमी)
दाऊ कुमार
सुड्ड जयस्वाल
सुरज जाटो
राहुल कुमार
रोहित कुमार
- स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर आमचे पथक अत्यंत जलद प्रतिसाद देत काही क्षणातच घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात आढळलेल्या एल पी गॅस सिलेंडर मधून एलपी या ज्वलनशील गॅसची गळती मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे “व्हेपर क्लाऊड एक्सप्लोजन” (Vapour Cloud Explosion) घडले असल्याचा प्राथमिक अंदाज असून सदर परिसरात अधिक प्रमाणात एलपी गॅस सिलेंडर असल्याने कारखान्यातील धूर आणि उष्णतेमुळे बचावकार्य आव्हानात्मक होते, परंतु प्रत्येक कामगाराला सुरक्षित बाहेर काढणे आणि पुढील स्फोटाचे धोके टाळणे हेच आमच्या जवानांचे मुख्य ध्येय होते.
– ऋषिकांत चिपाडे, अग्निशमन अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका












