न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३० नोव्हेंबर २०२५) :- वाकड परिसरातील विवाहित महिलेच्या बेपत्ता प्रकरणाचा अखेर उलगडा झाला असून तिचा विवाहित प्रियकराने गळा दाबून खून केल्याचे धक्कादायक तपासात समोर आले आहे. राणी विशाल गायकवाड असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी अनिकेत महादेव कांबळे (३३) याला पोलिसांनी अटक केली आहे.
२६ नोव्हेंबर रोजी राणी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली होती. तपासाच्या दरम्यान तिच्या मोबाईल लोकेशनचा मागोवा घेतला असता ती शेवटचा अनिकेतच्या संपर्कात असल्याचे समोर आले. चौकशीदरम्यान अनिकेतने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या दबावानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
दोघेही विवाहित असून त्यांना मुले आहेत. राणी सतत लग्नाचा आग्रह धरत असल्याने अनिकेतने तिला भेटायला बोलावले. गाडीतून फिरताना झालेल्या वादानंतर त्याने तिला धाराशीव जिल्ह्यातील ढोकी गावाजवळ नेले. पहाटे राणी झोपेत असताना तिचा गळा दाबून हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या मृतदेहाला पेटवले. तांत्रिक पुरावे आणि सखोल तपासाच्या आधारे वाकड पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकत प्रकरणाचा पर्दाफाश केला.












