- सर्व ३२ प्रभागांतील आरक्षण कायम..
- आता तक्रारदार काय निर्णय घेणार?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ डिसेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या १२८ जागांच्या आरक्षणावर आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांनी अंतिम शिक्कामोर्तब केले असून, दाखल झालेल्या एकूण ७२ हरकतींना त्यांनी न जुमानता राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित यादीलाच मान्यता दिली आहे. त्यामुळे सर्व ३२ प्रभागांतील आरक्षण कायम ठेवण्यात आले असून एकाही जागेत बदल झालेला नाही. आता निवडणूक प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.
११ नोव्हेंबरला प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सर्वांसमोर सोडत काढल्यानंतर आयोगाने काही दुरुस्त्या करत १७ नोव्हेंबरला सुधारित आरक्षणयादी जाहीर केली होती. विशेषत: प्रभाग क्रमांक १९ आणि ३० मधील प्रत्येकी दोन जागांमध्ये झालेले बदल शहरात चर्चेचा विषय ठरले. या दोन प्रभागांबाबत मोठ्या प्रमाणावर हरकती दाखल झाल्या, विशेषत: प्रभाग ३० संदर्भात सर्वाधिक आक्षेप नोंदविले गेले.
मात्र, आयुक्त हर्डीकर यांनी सर्व हरकती फेटाळून आयोगाच्या यादीलाच मान्यता दिली असून अंतिम अधिसूचना मंगळवारी (दि.२) प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे आरक्षणावर पडदा पडला असून निवडणुकीची तयारी अधिकृतरित्या सुरू होणार आहे.
दरम्यान, अचानक झालेल्या बदलांमागे राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप काही इच्छुकांनी केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की सोडतीनंतर आरक्षणात झालेला हस्तक्षेप हा पारदर्शकतेला विरोधी असून मोठा गैरव्यवहार आहे. हरकतींवर कोणतीही दखल न घेतल्याने तक्रारदारांनी न्यायालयीन लढाईची तयारी सुरू केली आहे.












