- अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी व वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आजपासून नवीन आदेश लागू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ डिसेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड शहरातील अपघातांची वाढलेली संख्या लक्षात घेऊन वाहतूक शाखेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सन 2023, 2024 आणि 2025 मधील अपघातांचे विश्लेषण करताना जड वाहनांच्या (डंपर, मिक्सर, हायवा आदी) वेगामुळे वारंवार होणारे अपघात आणि त्यातून निर्माण होणारा कायदा-सुव्यवस्था प्रश्न अधोरेखित झाला.
त्यामुळे शहरातील महामार्गावरील मुख्य मार्ग वगळता, सेवा रस्ते आणि सर्व अंतर्गत रस्त्यांवरून धावणाऱ्या सर्व जड-अवजड वाहनांसाठी जास्तीत जास्त वेगमर्यादा 30 किमी प्रतितास निश्चित करण्यात आली आहे.
पोलीस उप आयुक्त (वाहतूक) विवेक पाटील यांनी मोटार वाहन कायद्यानुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून ही अधिसूचना जारी केली आहे. फक्त अत्यावश्यक सेवांची वाहने—जसे की फायरब्रिगेड, पोलीस, रुग्णवाहीका—यांना या नियमातून सूट राहील.
शहरातील वाढत्या अपघातांचे प्रमाण कमी करणे, वाहतूक कोंडी रोखणे आणि सर्वसामान्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे हा निर्णयाचा उद्देश असल्याचे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे.
नवीन वेगमर्यादा ३ डिसेंबर २०२५ पासून पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहे.












