- आजपासून महापालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू..
- २८६९ जागांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ डिसेंबर २०२५) :- राज्यातील २९ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा बिगुल वाजला असून आजपासून राज्यभर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रमाची अधिकृत घोषणा केली. या निवडणुकांमधून एकूण २,८६९ जागांसाठी मतदान होणार असून राज्यातील सुमारे ३ कोटी ४८ लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
घोषित कार्यक्रमानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेत वार्ड पद्धतीने, तर उर्वरित २८ महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्यात येणार आहे. निवडणूक ईव्हीएम पद्धतीने होणार असून नामनिर्देशन पत्रे ऑफलाइन पद्धतीने स्वीकारली जाणार आहेत.
राखीव जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र अनिवार्य असून, निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे. मतदार यादीसाठी १ जुलै २०२५ रोजीची अंतिम मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे. दुबार मतदारांना डबल स्टार चिन्ह देऊन ओळख पटविण्यात आली आहे. मात्र, नाव वगळणे किंवा नव्या नोंदी करण्याचा अधिकार आमच्याकडे नाही, असे निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व महिलांसाठी मतदान केंद्रांवर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच मतदानाच्या ४८ तास आधी प्रचारावर निर्बंध लागू राहणार आहेत. खर्च मर्यादेबाबत ‘ब’ वर्गातील महापालिकांसाठी उमेदवाराला १३ लाख रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम…
नामनिर्देशन अर्ज दाखल : २३ ते ३० डिसेंबर २०२५
अर्ज छाननी : ३१ डिसेंबर २०२५
उमेदवारी अर्ज माघार : २ जानेवारी २०२६
चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी : ३ जानेवारी २०२६
मतदान : १५ जानेवारी २०२६
मतमोजणी : १६ जानेवारी २०२६












