- इंडिकेटर व रिफ्लेक्टर न लावता वाहन उभा केल्याने भीषण अपघात; ट्रकचालक अटकेत..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रावेत (दि. १८ डिसेंबर २०२५) :-पुणे–बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पुनावळे ब्रिज ओलांडल्यानंतर एच.पी. पेट्रोल पंपासमोर झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी निखिल नितीन धनावडे (वय २१, व्यवसाय, रा. पर्वती, पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक १७ डिसेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे ११.४० वाजताच्या सुमारास त्यांचा मित्र आदर्श मनोहर जगताप (वय २२) हा टी.व्ही.एस. ज्युपिटर स्कूटरवरून मुंबई बाजूकडून बेंगलोर बाजूकडे जात होता. पुनावळे येथे उतारावर महामार्गाच्या डाव्या लेनमध्ये आरोपी ट्रकचालक चंद्रशेखर शिंदे याने टाटा हायवा ट्रक निष्काळजीपणे उभा केला होता.
सदर ट्रकला कोणतेही इंडिकेटर, पार्किंग लाईट, रिफ्लेक्टर अथवा रेडियम चिन्ह न लावता तसेच वाहनाजवळ उपस्थित न राहता वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्यात आले. अंधारात ट्रक न दिसल्याने दुचाकी ट्रकच्या पाठीमागे धडकली. या अपघातात आदर्श जगताप यांना डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी आरोपी ट्रकचालकास अटक करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंभार हे करीत आहेत.












