(सुरज करांडे :- क्राईम रिपोर्टर…)
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
हिंजवडी (दि. २८ डिसेंबर २०२५) :- क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास ३० ते ४० टक्के नफा मिळेल, असे आमिष दाखवून एका तरुणाची तब्बल ३३ लाख ९६ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही फसवणूक १८ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून हिंजवडी येथे राहणाऱ्या दिग्विजय सुतार (वय ३०) यांच्यासोबत घडली.
फिर्यादींना मोबाईलवरून संपर्क करून टेलिग्राम गटांमार्फत क्रिप्टो गुंतवणुकीचे प्रस्ताव देण्यात आले. सुरुवातीला काही रक्कम परत देऊन त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे जमा करण्यास सांगितले. मात्र, पैसे परत मागितल्यावर आणखी रकमांची मागणी सुरू झाली. शेवटी फिर्यादीची एकूण ३३.९६ लाख रुपये अशी मोठी फसवणूक झाल्याचे समोर आले.
या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान अधिनियमासह संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास सपोनि चौधरी (हिंजवडी पोलिस ठाणे) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आरोपी अज्ञात असल्याने पोलिसांकडून सायबर ट्रेल तपासला जात आहे.
दरम्यान पोलिसांनी नागरिकांना इशारा दिला आहे की “उच्च परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या क्रिप्टो स्कीमपासून सावध राहा. खात्रीशिवाय पैसे पाठवू नका.”












