- उमेदवारांची घालमेल शिगेला…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा पत्रकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २८ डिसेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असली, तरी महाविकास आघाडी, दोन्ही राष्ट्रवादी गट आणि महायुती या तिन्ही आघाड्यांत जागावाटपाचा तिढा कायम आहे. मुंबईपासून पिंपरी-चिंचवडपर्यंत बैठकांवर बैठक, फोनाफोनी आणि चर्चांचा पाढा वाचला जात असला, तरी अद्याप कोणत्याही आघाडीचा अंतिम निर्णय झालेला नाही. परिणामी, उमेदवारांची धावपळ व अनिश्चितता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
महाविकास आघाडीत काँग्रेस, उद्धवसेना, मनसे व रासप यांच्या वाटाघाटींमध्ये प्रभागनिहाय ताकद, मागील निवडणुकांचे आकडे, स्थानिक समीकरणे आणि संभाव्य बंडखोरी या मुद्द्यांवरून मतभेद उफाळले आहेत. अनेक प्रभागांत एकाच जागेसाठी एकापेक्षा अधिक इच्छुक असल्याने नेतृत्व अडचणीत आले आहे. ‘एकत्र लढायचे’ सहमतीवर शिक्कामोर्तब झाले असले, तरी जागावाटपाचा तिढा सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. वंचित बहुजन आघाडीलाही सोबत घेण्यावर चर्चा सुरू आहे.
दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याबाबत हालचाली वेगात असल्याच्या बातम्या आहेत; मात्र “एकत्र की स्वतंत्र” या निर्णयावर अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही. काही जागांवरून निर्माण झालेला वाद मिटल्याचे दावे होत असले, तरी अधिकृत घोषणा प्रतीक्षेत आहे.
महायुतीत भाजप आणि शिंदेसेना यांच्यातही अंतिम फॉर्म्युला स्पष्ट नाही. तरीदेखील दोन्ही पक्षांनी संघटनाच्या जोरावर अनेक प्रभागांत आपापले उमेदवार निश्चित करून प्रचारालाही सुरुवात केली आहे. काही ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल होऊ लागल्याने जागावाटपाचा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा झाला आहे.
अर्ज भरण्याची अंतिम तारीख जवळ येत असताना, चर्चेतच वेळ खर्ची पडत आहे. त्यामुळे संभाव्य बंडखोरी, अपक्ष उमेदवारी आणि शेवटच्या क्षणी पक्षांतराची शक्यता अधोरेखित झाली आहे. पारंपरिकपणे ‘शेवटच्या क्षणी निर्णय’ हीच पद्धत असल्याने अनेक इच्छुकांची घालमेल शिगेला पोहोचली आहे.
आज रविवारी (दि. २९) दोन्ही राष्ट्रवादी संदर्भात महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात असली, तरी शहरातील राजकीय वातावरणात संभ्रम आणि तणाव कायम आहे.












