- अदाणी आणि पवार एकाच मंचावर असताना संजय राऊतांचा खळबळजनक दावा…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा पत्रकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २८ डिसेंबर २०२५) :- बारामती येथे आज ‘शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या केंद्राचे उद्घाटन अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांच्या हस्ते होत आहे. या निमित्ताने पवार कुटुंबातील प्रमुख नेते आणि गौतम अदाणी एकत्र आले असून, या भेटीने राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदाणी यांच्या संबंधांवर सातत्याने टीका होत असताना हा कार्यक्रम अधिकच चर्चेचा विषय ठरला आहे.
दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणी जोरदार प्रतिक्रिया दिली. राऊत म्हणाले, “मुंबईवर ताबा मिळवण्याच्या अदाणींच्या हालचालींना आमचा तात्विक विरोध आहे. भारतीय जनता पक्षाच्या मदतीने मुंबई ‘गिळण्याचा’ प्रयत्न सुरू आहे. अनेक मोठे उद्योगपती शहरात आले, पण अदाणींसारखी लालसा कुणी दाखवली नाही. हे मुंबई आणि मराठी माणसासाठी धोकादायक आहे.”
राऊतांनी पुढे स्पष्ट केले की, शरद पवार आणि गौतम अदाणी यांचे संबंध राजकीय नसून व्यक्तिगत असल्याचे त्यांनी ऐकले आहे. “कार्यक्रमाला कुणाला बोलवायचे हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. पवार कुटुंबासह अजित पवारही उपस्थित असतील, तर ती त्यांची बाब आहे,” असे ते म्हणाले.
याचवेळी त्यांनी आणखी एक वादग्रस्त दावा करत सांगितले “शरद पवारांचा पक्ष फोडण्यात अदाणींच्या भावाचा सहभाग होता, अशी मला ऐकीव माहिती आहे.” तसेच, “रोहित पवारांनी अदाणींच्या कारचे सारथ्य का केले हे त्यांनाच विचारावे,” अशीही त्यांनी टिप्पणी केली.
जुलै २०२३ मध्ये अजित पवार सत्तेत सहभागी झाले होते आणि उपमुख्यमंत्रीपद मिळवले. नंतर २०२४ च्या निवडणुकीनंतरही तेच पद कायम राहिले. पक्षफुटीच्या काळात आपण का वेगळे झालो याची कारणेही त्यांनी मांडली होती. आता राऊतांनी केलेल्या नव्या आरोपांमुळे अदाणी–पवार संबंधांवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
बारामतीत सुरू असलेल्या या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर, राजकीय चर्चांना आणखी वेग आला असून, पुढील काही दिवसांमध्ये या विषयावर नवे राजकीय संकेत मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.












