- देशातील स्मारकांचा उज्वल इतिहास नाट्य व नृत्यातून केला सादर…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा पत्रकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव (दि. २८ डिसेंबर २०२५) :- श्रीक्षेत्र देहू येथील सृजन फाऊंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये नुकतेच पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विभागाचे वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात पार पडले. ‘भारतातील स्मारके व ऐतिहासिक स्थळे’ ही संकल्पना घेऊन अभंग मधील बालचमूंनी आपल्या देशातील स्मारकांचा उज्वल इतिहास नाट्य व बहारदार नृत्यातून सादर करीत प्रेम, एकता व विश्वशांतीचा संदेश दिला.

दि.२६ डिसेंबर रोजी पूर्व प्राथमिक विभागातील नर्सरी ते युकेजी मधील चिमुकल्यांनी आपल्या नृत्याविष्कारातून सर्वांचेच लक्ष वेधून घेत रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. दि.२७ डिसेंबर रोजी प्राथमिक विभागातील इ. १ ली, ३ री व ६ वी तील विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्य कलेचे प्रदर्शन करत उपस्थितांची वाहवा मिळवली.
“भारतातील स्मारके” या संकल्पनेतून ऐतिहासिक वास्तूंमधून उमटलेले प्रतिध्वनीच या निमित्ताने जणू ऐकू आले. या स्मारकांमध्ये भारतातील अजिंठा–वेरूळ, नालंदा विद्यापीठ, हंपी आणि महाबलीपुरम, कोणार्क मंदिर, राणी की वाव, हवामहल, जंतर-मंतर, बॅसिलिका (ख्रिस्ती चर्च), ताजमहल, प्रतापगड, शनिवारवाडा, गेटवे ऑफ इंडिया, इंडिया गेट, लाल किल्ला, स्वामी विवेकानंद स्मारक, सुवर्ण मंदिर, लोटस मंदिर आदि स्मारकांचा समावेश करण्यात आला होता.
सर्वात प्रथम देवी वंदनाने स्नेहसंमेलनाची सुरुवात झाली. शाळेतील काही मुले सहलीला जातात व तिथे त्यांना जीन भेटतो… आणि हा जीन मुलांना भारतातील विविध स्मारकांची ओळख करुन देत माहिती सांगतो. या लघू नाट्यातूनच ही संकल्पना पुढे साकारत जाते. इ. पाचवीतील प्रसाद कुऱ्हाडे, पार्थ शिर्के, जुई भसे तसेच इ. सहावीतील श्रीशांत सुर्यवंशी व मुग्धा साळुंखे यांनी या लघुनाट्यात प्रमुख भूमिका साकारल्या. इ. तिसरीतील नित्यश्री पाटील व सोहम हराळे यांनी संपूर्ण स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन केले.
या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमासाठी योगीराज नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर, पुणे जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. गोरक्षनाथ काळे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे, अधिक ग्रुपचे मुख्य व्यवस्थापक विजय बोत्रे, योगीराज नागरी पतसंस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र विधाते, देहू नगरपंचायतच्या नगराध्यक्षा पूजा दिवटे, देहू नगरपंचायतचे मुख्य अधिकारी चेतन कोंडे देशमुख, देहू नगरपंचायतच्या कार्यालय अधीक्षक प्रियंका कदम, शारदा फाऊंडेशन मेडिकल ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. शंभू कोताळे, डॉ. नवनाथ शेळके, ज्योतिषाचार्य दत्तात्रय अत्रे, देहू वि. वि. का. सह. सोसायटीचे माजी चेअरमन अभिमन्यू काळोखे, सृजन फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनिल कंद, उपाध्यक्ष अशोक कंद, उपप्राचार्या शैलजा स्वामी, पूर्व प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका सुबलक्ष्मी पाठक आदी मान्यवर उपस्थित होते.
सृजन फाऊंडेशनचे सचिव प्रा. विकास कंद यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शाळेच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर यांनी प्रेक्षक पालकांसमोर शाळेच्या वार्षिक अहवालाचे सादरीकरण केले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या पालक वर्गाने मुलांच्या सादरीकरणाला उत्तम दाद देत मुलांचे व सर्व शिक्षकवृंदांचे भरभरुन कौतुक केले.












