मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा पत्रकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २८ डिसेंबर २०२५):- भक्ती शक्ती येथे आयोजित अभिनव जनजागृती उपक्रमातून पिंपरी-चिंचवडकरांना मतदानाचे महत्त्व प्रभावीपणे पटवून देण्यात आले. शेकडो युवकांनी मोबाईल टॉर्चच्या प्रकाशातून ‘VOTE’ असा शब्द साकारत १५ जानेवारीला होणाऱ्या महापालिका निवडणुकीत मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले.
महापालिका आयुक्त व निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या अधिपत्याखाली स्वीप कार्यक्रमांतर्गत शहरभर विविध जनजागृती उपक्रम राबविले जात आहेत. याच अनुषंगाने भक्ती शक्ती चौकात आयोजित उपक्रमाने नागरिकांचे विशेष लक्ष वेधले.
लोकशाही सशक्त करण्यासाठी मतदान आवश्यक असल्याचा संदेश यावेळी अधोरेखित करण्यात आला. युवकांसह प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. फ्लॅश मॉबच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला रंगत आणली.
महापालिका उपायुक्त अण्णा बोदडे यांच्या उपस्थितीत नागरिकांना “मतदानानेच लोकशाही उजळते” हा संदेश देण्यात आला. तसेच उपस्थितांना निःपक्षपाती, निर्भय आणि प्रलोभनमुक्त मतदानाची शपथ देण्यात आली. जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी शपथेचे वाचन केले.












