- “घड्याळावर शिक्का, काळेवाडीचा कायापालट पक्का!” – मच्छिंद्र तात्या तापकीर
- “प्रभाग २२ मध्ये विकासाची घडी बसतेय – तापकीर फॅक्टर प्रभावी”
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. १३ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक २२ मधील काळेवाडी, विजयनगर, पवनानगर, ज्योतिबानगर आणि नढेनगर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार वेग घेत असताना उमेदवार मच्छिंद्र तात्या तापकीर यांनी आपल्या आक्रमक शैलीत मतदारांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण केले आहे. “एकदा घड्याळावर शिक्का मारा, मग काळेवाडीचा कायापालट कसा होतो ते आम्ही करून दाखवतो,” असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.
प्रचार दौऱ्याच्या माध्यमातून तापकीर घराघरांत जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत. पिण्याच्या पाण्याची समस्या, वाहतूक कोंडी, खराब रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता, स्ट्रीटलाईट्स, आरोग्य सुविधा आणि उद्यानांची देखभाल या मुद्द्यांवर ते सविस्तर चर्चा करत आहेत. “नुसती आश्वासने देणारे अनेक आले आणि गेले, पण राष्ट्रवादीने केलेली कामे आजही जनतेसमोर आहेत,” असे सांगत त्यांनी आपल्या कामाचा लेखाजोखा मांडला.
काळेवाडी आणि आसपासच्या भागात गेल्या काही वर्षांत पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा झाली असली तरी अजूनही अनेक भागांत मूलभूत सुविधा अपुऱ्या आहेत. विजयनगर व पवनानगरमध्ये वाहतुकीची समस्या, ज्योतिबानगरमध्ये पाणीपुरवठ्याची अडचण तर नढेनगरमध्ये स्वच्छतेचा प्रश्न नागरिकांनी प्रचारादरम्यान उपस्थित केला. या सर्व प्रश्नांवर ठोस आणि कालबद्ध उपाययोजना राबवण्यात येतील, अशी ग्वाही तापकीर यांनी दिली.
महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र विकास आराखडा राष्ट्रवादीकडे तयार आहे. महिलांसाठी आरोग्य शिबिरे, सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही, युवकांसाठी क्रीडांगणे व कौशल्य विकास केंद्रे आणि ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्रे व आरोग्य सुविधा उभारण्याचा निर्धार त्यांनी जाहीर केला. तसेच, प्रभागातील शाळा, अंगणवाड्या आणि सार्वजनिक उद्यानांच्या विकासावर विशेष भर दिला जाणार आहे.
“घड्याळ हे फक्त निवडणूक चिन्ह नाही, तर वेळेवर काम करणाऱ्या विकासाचे प्रतीक आहे,” असे सांगत तापकीर यांनी मतदारांना राष्ट्रवादीला साथ देण्याचे आवाहन केले. सध्या सुरू असलेल्या झंझावाती प्रचारामुळे प्रभाग २२ मध्ये राष्ट्रवादीचा जनाधार अधिक मजबूत होत असून, काळेवाडीचा कायापालट घडवण्यासाठी जनतेत सकारात्मक वातावरण तयार होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.












