- प्रभाग २२ मध्ये झंझावाती, आक्रमक प्रचार दौऱ्यामुळे वातावरण राष्ट्रवादीमय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. १३ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक २२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रचाराची धुरा पूर्ण ताकदीने हाती घेतली असून, महिला उमेदवार मोनिकाताई नवनाथ नढे यांचा झंझावाती दौरा मतदारांमध्ये नवचैतन्य निर्माण करत आहे. सोमवारी ज्योतिबानगर, नढेनगर येथील गल्लीबोळांतून, सोसायट्यांमधून आणि बाजारपेठांमधून थेट मतदारांशी संवाद साधत मोनिकाताई यांनी “घड्याळाचा गजर यावेळी नक्कीच वाजणार” असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.
या प्रचार दौऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे थेट जनतेशी संवाद. घराघरांत जाऊन नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या जात आहेत. पाणीपुरवठा, ड्रेनेज, रस्ते, वीज, कचरा व्यवस्थापन, आरोग्यसेवा, उद्याने, शाळा व अंगणवाड्या अशा विविध प्रश्नांवर मोनिकाताई सविस्तर चर्चा करत आहेत. “नुसती आश्वासने देऊन मतं मागण्यापेक्षा कामाचा लेखाजोखा मांडणं हे आमचं धोरण आहे,” असे सांगत त्यांनी गेल्या काळातील विकासकामांचा दाखलाही दिला.
महिला, ज्येष्ठ नागरिक आणि तरुण मतदारांसाठी विशेष उपक्रम राबवण्याचा राष्ट्रवादीचा अजेंडा आहे. महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे, बचत गटांना प्रोत्साहन, तसेच सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही नेटवर्क; तरुणांसाठी क्रीडांगणे, व्यायामशाळा आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षण केंद्रे; आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रे व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या आक्रमक प्रचार दौऱ्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले असून, प्रत्येक गल्लीत घड्याळ चिन्हाचा प्रचार प्रभावीपणे सुरू आहे. स्थानिक नागरिकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, “यावेळी विकासासाठीच मत देणार” अशी भावना स्पष्टपणे दिसून येत आहे.
“प्रभाग २२ चा सर्वांगीण विकास हा आमचा एकमेव ध्यास आहे. जनतेने आतापर्यंत दिलेल्या प्रेमाला आम्ही प्रामाणिक कामातून उत्तर दिलं आहे आणि पुढील पाच वर्षांत काळेवाडीला आदर्श प्रभाग बनवण्याचा आमचा निर्धार आहे,” असे मोनिकाताई नवनाथ नढे यांनी सांगितले. राष्ट्रवादीचा हा थेट संवाद आणि झंझावाती प्रचार प्रभाग २२ मध्ये घड्याळाचा गजर अधिकच बुलंद करत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.












