- आज सायंकाळी साडेपाच वाजता प्रचार थांबणार..
- या दोन उमेदवारांच्या लढतीत मतदार कोणाला कौल देणार?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. १३ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पंचवार्षिक निवडणूक येत्या गुरुवारी (दि. १५) होत असून आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार सायंकाळी साडेपाच वाजता प्रचार थांबणार आहे. त्यामुळे उमेदवारांकडून आज शेवटच्या टप्प्यात जोरदार प्रचार, मतदारांशी थेट संवाद आणि भेटीगाठींवर भर देण्यात येत आहे.
दरम्यान प्रभाग क्रमांक २७ रहाटणीमध्ये यंदाच्या निवडणुकीत अर्चना विनोद तापकीर (भारतीय जनता पार्टी) आणि अनिता कैलास थोपटे (राष्ट्रवादी काँग्रेस) यांच्यात सरळ लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. जरी इतर उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात असले, तरी प्रत्यक्षात ही निवडणूक या दोन प्रमुख महिला उमेदवारांभोवतीच फिरताना दिसत आहे.
दोन्ही उमेदवारांनी प्रभागातील विकासकामे, नागरी सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि महिला-सुरक्षितता यासारख्या मुद्द्यांवर भर देत प्रचार केला आहे. शेवटच्या दिवशी समर्थक, कार्यकर्ते आणि हितचिंतकांच्या माध्यमातून वातावरण तापले असून मतदारांचा कल कोणाच्या बाजूने जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आता प्रचाराचा पडदा पडत असून, गुरुवारी होणाऱ्या मतदानातूनच प्रभाग क्रमांक २७ चा कौल स्पष्ट होणार आहे.












