- पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज…
- महापालिका आयुक्तांकडून मतदान केंद्रांची पाहणी…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १४ जानेवारी २०२६) :- गुरूवार दि. १५ जानेवारी २०२६ रोजी होणारी मतदान प्रक्रिया मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका यंत्रणा सज्ज असून मतदारांनी आपला संविधानिक हक्क बजावण्यासाठी उत्स्फुर्तपणे मतदान करून इतर पात्र मतदारांना मताधिकार बजावण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.
महापालिका क्षेत्रातील एकूण मतदार संख्या १७ लाख १३ हजार ८९१ इतकी असून यामध्ये ९ लाख ५ हजार ७२८ पुरुष, ८ लाख ७ हजार ९६६ स्त्रिया आणि १९७ इतर मतदारांचा समावेश आहे. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी १५ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, प्रभाग क्रमांक १६ हा ७५ हजार १०५ मतदारांसह सर्वाधिक मतदारांचा प्रभाग ठरला आहे, तर प्रभाग क्रमांक २३ मध्ये सर्वात कमी म्हणजे ३३ हजार ३३ मतदार आहेत. मतदारांच्या सोयीसाठी एकूण २ हजार ६७ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
यामध्ये काही तात्पुरत्या स्वरूपात मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली असून, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयनिहाय त्याची संख्या निश्चित करण्यात आलेली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय क्रमांक १ अंतर्गत ५२, कार्यालय क्रमांक २ अंतर्गत ५४, कार्यालय क्रमांक ३ अंतर्गत ३, कार्यालय क्रमांक ४ अंतर्गत सर्वाधिक १०८, कार्यालय क्रमांक ५ अंतर्गत २७, कार्यालय क्रमांक ६ अंतर्गत २२, कार्यालय क्रमांक ७ अंतर्गत २३ तसेच कार्यालय क्रमांक ८ अंतर्गत ३३ तात्पुरती मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. अशा प्रकारे महापालिका कार्यक्षेत्रात एकूण ३२२ तात्पुरत्या मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
मतदान केंद्रावर विविध सुविधा..
प्रत्येक मतदान केंद्रावर वैद्यकीय सुविधा देण्यासाठी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पिण्याचे पाणी, व्हिलचेअर व्यवस्था, प्रतिक्षा कक्ष तसेच प्रथमोपचार पेटीसह इतर सुविधा देण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती अनिल पवार यांनी दिली.
कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस यंत्रणा सज्ज..
भयमुक्त व निकोप वातावरणात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असून नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार शिवाय विविध पथकांद्वारे देखील पोलीस यंत्रणा बारकाईने लक्ष ठेवून आहे. पोलीस बंदोबस्तासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असून त्याद्वारे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मतदान केंद्र तसेच इतर ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने दक्षता घेण्यात आली आहे.
कंट्रोल रुमद्वारे लक्ष ठेवणार..
मतदानाच्या दिवशी संपुर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सर्व मतदान केंद्रे वेब कास्टिंगद्वारे जोडण्यात आली आहेत. तसेच संपुर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून तात्काळ समन्वय करण्यासाठी नियंत्रण कक्ष उभारण्यात आला असून समन्वयासाठी समन्वय अधिकारी नियुक्ती करण्यात आली आहे.
मतदान केंद्रावर मतदारांना मोबाईल नेण्यास मनाई….
मतदाराला त्याचे मतदान केंद्र, मतदार यादीतील आणि इतर आवश्यक माहिती देण्यासाठी स्लिपा महत्वाच्या आहेत. बूथ स्तरावरील अधिकाऱ्यांच्या सहाय्याने घरोघरी जाऊन या स्लिपांचे वाटप करण्यात आले आहे. याशिवाय स्लिप वाटर करताना मतदान केद्रांमध्ये मोबाईल घेऊन जाण्यास मनाई असल्याबाबत मतदारांना माहिती देण्यात आली आहे. याशिवाय, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयनिहाय सर्व मतदान केंद्रावर स्वयंसेवक यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच मतदान केंद्राबाहेर मतदारांचे मोबाईल ठेवण्यासाठी मैथिली व आंगणवाडी सेविकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
१६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासून पार पडणार मतमोजणी..
मतमोजणी निश्चित केलेल्या ठिकाणी शुक्रवार दि. १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार आहे. ई. व्ही. एम फेरीसाठी स्वतंत्र टेबल असणार आहेत. तसेच टपाली मतमोजणीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणीचा प्रत्येक फेरीनिहाय निकाल जाहिर करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयनिहाय नियोजन करण्यात आले असून सर्व निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय स्तरावर स्वतंत्र मिडीया सेलची व्यवस्था करण्यात येणार आहे.
दरम्यान, आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी महापालिका कार्यक्षेत्रातील ८ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयनिहाय उभारण्यात आलेल्या मतदान साहित्य वाटप केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी सुरू असलेल्या मतदान साहित्य वाटप प्रक्रियेचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. मतदान प्रक्रियेत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाची तपासणी करताना साहित्य वितरण वेळेत, सुयोग्य व शिस्तबद्ध पद्धतीने होत आहे का, याची खात्री त्यांनी करून घेतली.
या पाहणी दरम्यान उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुप्रिया डांगे, अर्चना तांबे, डॉ. दिप्ती सूर्यवंशी, अर्चना पठारे, हिम्मत खराडे,अनिल पवार, नितीन गवळी, पल्लवी घाटगे, निवडणूक विभागाचे उप आयुक्त सचिन पवार, उप आयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे तसेच ८ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह विविध कक्षांचे प्रमुख उपस्थित होते.












