संतोष जराड, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १४ जानेवारी २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने मतदान प्रक्रियेची तयारी अंतिम टप्प्यात असून मतदानासाठी आवश्यक असलेले मतदान साहित्य व मतदान केंद्रावरील पथके सुरक्षितपणे आपापल्या मतदान केंद्रांवर पोहोचली असल्याची माहिती निवडणूक विभागाचे उप आयुक्त सचिन पवार यांनी दिली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेली एकूण २०६७ मतदान केंद्रांवरील नियुक्त १०३३५ कर्मचारी यांसह सुरक्षा विभागातील कर्मचारी,शिपाई,मजूर यांसह पथके मतदान साहित्यासह मतदान केंद्रावर मतदान साहित्य — ईव्हीएम यंत्रे, मतदानासाठी लागणारे कागदपत्रे, सीलबंद साहित्य तसेच अन्य आवश्यक सामग्री सुरक्षितपणे मतदान केंद्रांवर पोहोचली.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततापूर्ण आणि निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासनाकडून काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. मतदान पथकांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी पोलीस प्रशासन, वाहतूक विभाग तसेच संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम केले. उद्या होणाऱ्या मतदानासाठी सर्व व्यवस्था सज्ज झाली आहे.











