- आकर्षक नोंदणी क्रमांकांसाठी अर्ज व लिलाव प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर…
संतोष जराड, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १४ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत दुचाकी वाहनांसाठी MH14NB ही नवीन नोंदणी मालिका लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या नवीन मालिकेमुळे दुचाकी वाहनधारकांना आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक मिळवण्याची संधी उपलब्ध होणार आहे. नागरिकांचा होणारा त्रास कमी व्हावा आणि कार्यालयीन कामकाज सुलभ व्हावे, या उद्देशाने ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
आकर्षक व पसंतीचे क्रमांक राखून ठेवण्यासाठी इच्छुक दुचाकी वाहनधारकांनी विहित शुल्क भरून दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २.३० या वेळेत अर्ज करावा. तर राखीव क्रमांकांसाठी अर्ज प्रक्रिया २१ जानेवारी २०२६ रोजी राबवण्यात येणार आहे. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास लिलाव पद्धतीने क्रमांक निश्चित केला जाणार आहे.
अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे, ओळखपत्रे व ठेवीची रक्कम (डी.डी.) सादर करणे बंधनकारक राहणार आहे. लिलावानंतर ज्या अर्जदारास क्रमांक मंजूर होईल, त्याला वाहन नोंदणीसाठी ठरावीक कालावधीत वाहन सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा राखीव क्रमांक रद्द होऊन भरलेले शुल्क शासन जमा होईल, असे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.












