न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १४ जानेवारी २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ चे मतदान दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी होणार असून, त्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या मतदार सोयी सुविधा व दिव्यांग मतदार कक्षाच्या वतीने शहरातील ८ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ३२ प्रभागांमधील सर्व मतदान केंद्रांवर विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
मतदान केंद्रांवर सर्व मतदारांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रकाश व्यवस्था, शौचालयांची सुविधा तसेच दिव्यांग मतदारांसाठी रॅम्पची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व मतदान केंद्रांवर स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली असून, एकूण ४५३ व्हीलचेअर्स प्रभागनिहाय वाटप करण्यात आले आहेत. ज्या मतदान केंद्रांवर १० पेक्षा अधिक खोल्या आहेत, त्या ठिकाणी किमान दोन व्हीलचेअर्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या सुविधांसाठी आरोग्य विभागाकडील कर्मचारी, मोरवाडी व कासारवाडी आयटीआय, डी. वाय. पाटील कॉलेज, महात्मा फुले कॉलेज, सिम्बॉसिस कॉलेज, भैरवनाथ ज्युनिअर कॉलेज येथील एन.एस.एस.चे विद्यार्थी, लाईट हाऊस प्रकल्पातील प्रशिक्षणार्थी विद्यार्थी, बालविकास प्रकल्प कार्यालयाकडील अंगणवाडी व बालवाडी शिक्षिका तसेच सक्षमा प्रकल्पाअंतर्गत कार्यरत महिलांची नेमणूक करण्यात आली आहे.
दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच, इतर मतदारांसाठीही मतदानाच्या दिवशी विविध विशेष सोयी सुविधा पुरवण्यात येणार आहेत. मतदारांचे मोबाईल जमा करून त्यांना टोकन क्रमांक देण्यासाठी आवश्यक टोकन व साहित्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मतदान केंद्रांवरील गर्दी व्यवस्थापन व मतदारांच्या रांगा नियोजित पद्धतीने लावण्यासाठी एन.एस.एस.चे विद्यार्थी व इतर स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येत आहे.
या सर्व सुविधांमुळे दिव्यांग नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच सर्व मतदारांना सुलभ, सुरक्षित व सुरळीतरीत्या मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने मतदानाच्या दिवशी सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांगासाठी विशेष सोयी-सुविधा पुरवण्यात आल्या असून, सर्व नागरिकांनी मतदानाचा अधिकार बजावून आपल्या संविधानिक कर्तव्याचे पालन करून लोकशाही प्रक्रिया बळकट करावी.
– ममता शिंदे,
– उप आयुक्त तथा नोडल अधिकारी, मतदार सोयी सुविधा व दिव्यांग मतदार कक्ष, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.












