- पिंपरी चिंचवड महापालिकेने पर्यावरण पूरक संदेश देणारे ८ ‘नाविन्यपूर्ण मतदान केंद्र’ केले तयार….
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १४ जानेवारी २०२६) :- लोकशाहीचा उत्सव केवळ मतदानापुरता मर्यादित न राहता तो सामाजिक, पर्यावरणीय आणि नागरिकांच्या जबाबदारीची जाणीव करून देणारा ठरावा, या हेतूने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा अभिनव उपक्रम राबवला असून शहरात निसर्गसंवर्धन, स्वच्छता, आरोग्य आणि शाश्वत विकासाचा संदेश देणारी नाविन्यपूर्ण मतदान केंद्रे उभारली असून पर्यावरण पूरक विचार, नागरिकांची जबाबदारी आणि लोकशाही मूल्यांचा सुंदर समन्वय साधला आहे. असे प्रतिपादन तृप्ती सांडभोर यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी महापालिकेच्या ८ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत एकूण ८ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात एक याप्रमाणे एकूण ८ नाविन्यपूर्ण मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. या मतदान केंद्राची पाहणी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी आज केली तसेच पाहणीदरम्यान मतदान केंद्रावर आवश्यक त्या सर्व सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या नाविन्यपूर्ण मतदान केंद्रांमध्ये ‘सौर ऊर्जा’, ‘हरित मतदान केंद्र’, ‘ओला व सुका कचरा वर्गीकरण’, ‘तंदुरुस्त रहा (Stay Fit), ‘आरआरआर (Reduce, Recycle, Reuse) , ‘पाणी वाचवा’, ‘स्वच्छ हवा कृती आराखडा (GRAP – Clean Air)’ तसेच ‘पंचतत्त्व’ अशा महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश करण्यात आला आहे.या प्रत्येक नाविन्यपूर्ण मतदान केंद्रात संबंधित विषयानुसार सजावट, माहितीपर फलक व जनजागृती संदेशांच्या माध्यमातून मतदारांमध्ये पर्यावरणीय व सामाजिक जाणीव निर्माण करण्याचा उद्देश आहे.
‘सौर ऊर्जा’ विषयावर आधारित मतदान केंद्र न्यू पुणे पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, आकुर्डी येथे साकारले असून याद्वारे सौर ऊर्जेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. तर आचार्य श्री आनंद ऋषींजी इंग्लिश मिडीयम स्कूल, चिंचवड येथे ‘हरित मतदान केंद्र’ बनवण्यात आले असून याद्वारे पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश दिला गेलाय. ‘ओला व सुका कचरा वर्गीकरण’ या विषयातून स्वच्छतेचे महत्त्व सांगण्यात आले असून ही संकल्पना सावित्रीबाई फुले शाळा मोशी मतदान केंद्रावर राबवण्यात आली आहे. प्राथमिक विद्यालय जाधववाडी, चिखली या मतदान केंद्रावर ‘आरआरआर’ या संकल्पनेद्वारे शाश्वत विकासाचा संदेश देण्यात आला आहे. ‘तंदुरुस्त रहा’ या विषयातून नागरिकांना आरोग्यदायी जीवनाचा संदेश दिला गेला असून हे मतदान केंद्र जी. के. गुरुकुल स्कूल पिंपळे सौदागर येथे आहे. ‘पाणी वाचवा’ या विषयातून जलसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले असून हे नाविन्यपूर्ण मतदान केंद्र जी. के. गुरुकुल स्कूल पिंपळे सौदागर येथे आहे. तर,प्रिन्स सोसायटी थेरगाव येथे साकारण्यात आलेल्या मतदान केंद्रावर ‘स्वच्छ हवा कृती आराखडा (ग्रॅप)’ या विषयातून स्वच्छ व निरोगी हवेचा संदेश देण्यात आला आहे तसेच स्त्री शक्ती सबलीकरण याविषयक बूथ उभारण्यात आले. मनपा विद्यालय, कासारवाडी या ठिकाणच्या ‘पंचतत्त्व’ या विषयातून पृथ्वी, जल, अग्नी, वायू व आकाश या पंचमहाभूतांचा समतोल जपण्याचा संदेश दिला गेला आहे.
मतदानाचा हक्क बजावताना पर्यावरण व समाजाप्रती असलेली जबाबदारी प्रत्येक मतदाराच्या मनात रुजावी, या उद्देशाने ही नाविन्यपूर्ण मतदान केंद्रे उभारण्यात आलेली आहेत.
दरम्यान, पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी १५ जानेवारी २०२६ रोजी मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाही बळकट करावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ ही केवळ मतदानाची प्रक्रिया नसून, नागरिकांमध्ये पर्यावरणीय जाणीव, स्वच्छता, आरोग्य व शाश्वत विकासाबाबत जागरूकता निर्माण करण्याची संधी आहे. याच उद्देशाने प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात विषयाधारित नाविन्यपूर्ण मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. मतदारांनी मतदानाचा हक्क बजावताना सामाजिक व पर्यावरणीय जबाबदारीची जाणीव ठेवावी, या उद्देशाने ही मतदान केंद्र उभारली आहेत.
-श्रावण हर्डीकर, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका.नाविन्यपूर्ण मतदान केंद्रांच्या माध्यमातून ‘सौर ऊर्जा’, ‘हरित मतदान केंद्र’, ‘ओला व सुका कचरा वर्गीकरण’, ‘पाणी वाचवा’ तसेच ‘पंचतत्त्व’ यांसारख्या विषयांवर प्रभावी जनजागृती करण्यात येत आहे. मतदारांना मतदानाचा सकारात्मक व अर्थपूर्ण अनुभव मिळावा, तसेच लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभागी होताना पर्यावरणपूरक विचार आत्मसात व्हावा, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.
-तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका.












