- शंभरीकडे धावणारा भाजपचा वारू अजितदादांच्या राष्ट्रवादीने रोखला..
- तिकीट वाटपातील सस्पेंस नडला?…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १७ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा ‘शत प्रतिशत’चा नारा पूर्णपणे फोल ठरल्याचे चित्र निकालातून स्पष्ट झाले आहे. शंभरीचा टप्पा गाठण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. उलट अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ३६ जागांवर दमदार विजय मिळवत भाजपच्या विजयमार्गात मोठा अडथळा निर्माण केला. त्यामुळे भाजपचा वारू शंभरीच्या आधीच रोखला गेला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
शहरात भाजपचे चार आमदार असतानाही आणि सत्तेचा प्रभाव असूनही पक्षाला ‘मॅजिक फिगर’ गाठता न आल्याने संघटनात्मक कमकुवतपणा समोर आला आहे. विशेषतः उमेदवार निवडीत शेवटपर्यंत ठेवलेल्या सस्पेन्समुळे निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झाले. तिकीट वाटपातील गोंधळ, स्थानिक नेतृत्वाचे दुर्लक्ष आणि गटबाजी याचा फटका थेट मतदानावर बसल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, शिवसेनेनेदेखील सहा जागा राखत या अडसरमध्ये ‘खारीचा वाटा’ उचलला. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरात तळ ठोकत सभा गाजवल्या. त्याचा प्रत्यय राष्ट्रवादीने शहरात भाजपविरोधी मते एकवटत प्रभावी रणनीती राबवल्याचे दिसून आले. त्यामुळे खऱ्या अर्थाने ‘जॉइंट किलर’ची भूमिका राष्ट्रवादीने बजावल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
एकंदरीत, मोठ्या घोषणांच्या पलीकडे जाऊन स्थानिक संघटन मोठ्या प्रमाणावर आयात उमेदवारांना घातलेल्या पायघड्या आणि नाराजांचे व्यवस्थापन करण्यात भाजपला अपयश आल्यामुळेच शंभरीपारची घोषणा हवेतच गेल्याचे या निकालातून स्पष्ट होते.











