- ‘नागरिकांनी विकासाचे “व्हिजन” स्वीकारले’…
अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जानेवारी २०२६) :- भारतीय जनता पक्षाने निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडली. पक्षाने दिलेला विश्वास सुज्ञ मतदारांमुळे सार्थ ठरला आहे. निवडणूक विकासाच्या विरोधात लढवली गेली मात्र नागरिकांनी विकासाचे “व्हिजन” स्वीकारले. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ही विकासाची घोडदौड आता कायम राहणार आहे. आगामी काळात नियोजन, व्यवस्थापन आणि अंमलबजावणी अशी त्रिसूत्री वापरून शहराचा विकासाचा आलेख उंचावत नेणार असल्याची ग्वाही निवडणूक प्रचार प्रमुख तथा आमदार शंकर जगताप यांनी दिली.
पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या निमित्ताने संवाद साधतान निवडणूक प्रचार प्रमुख आमदार शंकर जगताप म्हणाले, 15 जानेवारी रोजी मतदान पार पडले. 16 जानेवारी रोजी या निवडणुकीचा निकाल घोषित करण्यात आला. यामध्ये भारतीय जनता पार्टीला पिंपरी चिंचवड मधील सुज्ञ नागरिकांनी भरभरून कौल दिला आहे याबद्दल भारतीय जनता पक्ष सर्व पिंपरी चिंचवड करांचे मनःपूर्वक आभारी आहे.
याबाबत शंकर जगताप म्हणाले, पिंपरी चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध आहे. पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, सार्वजनिक वाहतूक, आरोग्य व शिक्षण या मूलभूत प्रश्नांवर ठोस निर्णय घेतले जातील. स्मार्ट सिटीच्या धर्तीवर शहराचा विकास करताना तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येईल. उद्योगपूरक वातावरण निर्माण करून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे, तसेच तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना राबवण्यात येणार आहेत.
शहराचा विकास करताना नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असून पारदर्शक व गतिमान प्रशासन देणे ही आमची प्राथमिकता राहील. नियोजन, व्यवस्थापन आणि प्रभावी अंमलबजावणी या त्रिसूत्रीच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडचा विकासाचा वेग अधिक वाढवण्यात येईल. विरोधकांनी विकासाऐवजी नकारात्मक राजकारण केले, मात्र नागरिकांनी सकारात्मक विचार करून विकासालाच पसंती दिली, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे.
पिंपरी चिंचवड शहराला महाराष्ट्रातील आदर्श आणि विकसित शहर बनवण्यासाठी भारतीय जनता पक्ष सातत्याने काम करत राहील, असा विश्वासही आमदार शंकर जगताप यांनी यावेळी व्यक्त केला.












