- प्रभाग क्रमांक १० मधील भाजप पॅनेलला सर्वाधिक मतांचा ऐतिहासिक कौल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रात आपले राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. राज्यातील अनेक महानगरपालिका भाजपच्या ताब्यात आल्या असून पिंपरी-चिंचवडमध्येही भाजपने घवघवीत यश संपादन केले आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक १० मधून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत पॅनेलने सर्वाधिक मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. हा पॅनेल आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली निवडणूक रिंगणात उतरला होता. या भाजपच्या अधिकृत पॅनेलमधून प्रभाग क्र.१० मधून (अ) श्रीमती अनुराधाताई गोरखे, (ब) सौ. सुप्रियाताई महेश चांदगुडे (बिनविरोध), (क) श्री. कुशाग्र मंगलाताई अशोक कदम, (ड) श्री. तुषार रघुनाथ हिंगे यांचा प्रचंड मतांनी विजय झालेला आहे. एक बिनविरोध तर बाकी ३ हि उमेदवार हजारोंच्या मतांनी विजयी झाले आहे.
केंद्र व राज्यातील भाजप सरकारने घेतलेले लोकहिताचे निर्णय, पारदर्शक प्रशासन, तसेच आमदार अमित गोरखे यांची भक्कम साथ व सातत्यपूर्ण जनसंपर्क — या सर्व घटकांचा संगम म्हणजे हा जनतेचा कौल असल्याचे बोलले जात आहे. महापालिकेतील भाजप सत्ताकाळात झालेली विकासकामे, धोरणात्मक निर्णय आणि नागरिकांच्या प्रश्नांवर दिलेले ठोस उपाय याच आधारे उमेदवारांनी निवडणुकीला सामोरे जात जनतेचा विश्वास संपादन केला.
या विजयाबद्दल सर्व विजयी उमेदवारांनी प्रभागातील नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानत, जनतेने दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, असा निर्धार व्यक्त केला आहे.
यावेळी बोलताना अनुराधाताई गोरखे म्हणाल्या की, प्रभागातील पायाभूत सुविधा, नागरी समस्या, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा तसेच मूलभूत सोयी-सुविधांच्या विकासावर विशेष भर देण्यात येईल आणि प्रभाग क्रमांक १० चा सर्वांगीण व नियोजित विकास साधला जाईल. तसेच पक्षाचे जिल्हाध्यक्ष कार्यकर्ते पदाघिकारी यांचे देखील विशेष आभार त्यांनी मानले.











