- मतदान केंद्रांवरील गोंधळ, EVM तक्रारी आणि यादीतील नावांच्या गोंधळाने प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह?..
- आता फक्त उरली अर्धा तासांची डेडलाईन…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १५ जानेवारी २०२६) :- तब्बल नऊ वर्षांनंतर होत असलेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला संथगती लागल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरातील ३२ प्रभागांसाठी २०६७ मतदान केंद्रांवर मतदान सुरू असले तरी अनेक ठिकाणी गोंधळ, तांत्रिक अडचणी आणि प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे मतदानावर परिणाम होत आहे.
सकाळी ७.३० ते ९.३० या पहिल्या दोन तासांत केवळ ६.५६ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर दुपारपर्यंत मतदानाचा टक्का वाढला असला, तरी अपेक्षित गती मात्र दिसून आलेली नाही. दुपारी ३.३० पर्यंत केवळ ४०.५० टक्के मतदान झाले होते. त्यानंतरची आकडेवारी अद्याप प्राप्त नाही. आता उरलेल्या अवघ्या अर्धा तासांत मतदानाचा टक्का किती वाढतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चिंचवडगाव येथील उर्दू शाळेतील मतदान केंद्रावर EVM मशीनमध्ये ‘मशाल’ चिन्ह दाबल्यानंतर ‘कमळ’ला मतदान होत असल्याचा आरोप झाल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला. यामुळे मतदान प्रक्रिया थांबवावी लागली होती. तसेच अनेक ठिकाणी मतदारांना मतदान केंद्र सापडत नसणे, मतदार यादीत नाव नसणे, बोटावरील शाई लगेच पुसली जाणे, अशा तक्रारी समोर आल्या आहेत.
या गोंधळामुळे काही मतदारांनी मतदान न करता माघार घेतल्याचे चित्र आहे. तर काही मतदार अद्यापही केंद्र शोधत फिरत असल्याची परिस्थिती आहे. आशिया खंडातील एकेकाळची सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये मतदान प्रक्रियाच चर्चेचा विषय ठरली आहे. विरोधी पक्षांनी या ढिसाळ व्यवस्थापनावर सरकार आणि प्रशासनावर जोरदार टीका केली आहे.












