- निवडणुकीत साथ घेतली, पद देताना मात्र दुय्यम वागणूक दिल्याचा भाजपवर आरोप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ फेब्रुवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्तास्थापनेपूर्वीच महायुतीत अंतर्गत मतभेद उघड होत असल्याचे चित्र समोर आले आहे. पदवाटपाच्या प्रक्रियेत मित्रपक्षांना योग्य प्रतिनिधित्व न दिल्याचा आरोप करत रिपब्लिकन पक्षाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे सत्ताधारी आघाडीत अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
महापालिकेतील महत्त्वाच्या पदांबाबत निर्णय घेताना मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांचा वापर केवळ निवडणुकीपुरता केल्याचा आरोप करण्यात येत आहे. निवडणुकीत मतांसाठी सहकार्य घेतले जाते, मात्र सत्ता स्थापनेच्या वेळी पदांमध्ये स्थान देताना दुर्लक्ष होत असल्याचा सूर व्यक्त करण्यात आला आहे. विशेषतः उपमहापौर किंवा स्थायी समितीसारख्या महत्त्वाच्या पदांवर संधी न मिळाल्याने नाराजी वाढल्याचे सांगितले जात आहे.
याबाबत बोलताना आरपीआयचे शहराध्यक्ष कुणाल वाळकवकर म्हणाले, “निवडणुकांच्या वेळी आमच्या कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र सत्तेत सहभागी करून घेण्याची वेळ आली की आमच्या पक्षाला योग्य प्रतिनिधित्व दिले जात नाही. किमान महत्त्वाच्या समित्यांमध्ये किंवा पदांमध्ये स्थान देऊन आमच्या कार्यकर्त्यांचा सन्मान करणे आवश्यक आहे.”
पदवाटपाच्या प्रक्रियेदरम्यान आघाडीत समन्वयाचा अभाव दिसून येत असल्याचेही बोलले जात आहे. मित्रपक्षांच्या अपेक्षा पूर्ण न झाल्यास आगामी काळात राजकीय समीकरणांवर परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता स्थानिक राजकारणावर परिणाम करू शकते, अशीही चर्चा रंगली आहे.
दरम्यान, सत्ताधारी पक्षाने सर्व निर्णय संघटनात्मक निकषांवर घेतले जात असल्याचा दावा केला असला, तरी मित्रपक्षांकडून सुरू असलेल्या नाराजीमुळे महापालिकेतील सत्तासंतुलनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आगामी काळात पदवाटपाच्या मुद्यावरून आघाडीत अधिक तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.












