- दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; दोन जणांविरोधात गुन्हा दाखल…
सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ फेब्रुवारी २०२६) :- हॉटेल व्यवसायात भागीदारी देऊन मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल ३८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना डिसेंबर २०२३ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत चऱ्होली परिसरात घडली. फिर्यादी धिमन निताई सरकार (वय ४७, रा. चऱ्होली) यांचा विश्वास संपादन करून आरोपी सुकेश शेखर शेट्टी आणि शंकर जगन्नाथ शेट्टी यांनी वारजे माळवाडी येथील हॉटेल व्यवसायात भागीदारी देण्याचे आमिष दाखवले.
फिर्यादीकडून हॉटेल आणि बँक्वेट हॉल व्यवसायात गुंतवणुकीच्या नावाखाली सुमारे ४२ लाख रुपये घेतल्याचे सांगितले जाते. काही काळ हॉटेल चालवून त्यातून बँकेचे कर्जाचे हप्ते भरले गेले. मात्र त्यानंतर फिर्यादीला कोणताही आर्थिक मोबदला देण्यात आला नाही. तसेच फिर्यादीला विश्वासात न घेता हॉटेल तिसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करून मिळालेली रक्कमही परस्पर घेतल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात आरोपींनी गुंतवलेली रक्कम परत न करता सुमारे ३८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.











