न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १७ जून २०२६) :- चऱ्होली बुद्रुक येथील काळजेवाडी परिसरात ७५ वर्षीय वृद्ध महिलेची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शकुंतला काळूराम गिलबिले असे मृत महिलेचे नाव असून त्यांचा मृतदेह मंगळवारी (दि. १६) सायंकाळी घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. प्राथमिक तपासानुसार दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान ही हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पतीच्या निधनानंतर शकुंतला गिलबिले या एकट्याच राहत होत्या. त्यांचा मुलगा अलीकडेच अन्यत्र राहण्यासाठी गेल्याने त्या घरात एकट्या होत्या. सायंकाळी त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच दिघी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पाहणीदरम्यान धारदार शस्त्राने त्यांचा गळा चिरण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
सुरुवातीला चोरीच्या उद्देशातून हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने सुरक्षित असल्याने केवळ चोरी हा हेतू नसावा, असे पोलिसांचे मत आहे. त्यामुळे मालमत्तेचा वाद किंवा अन्य वैयक्तिक कारणांचा तपास केला जात आहे. पोलिसांनी नातेवाईकांची चौकशी सुरू केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक पथकही तपासात सहभागी झाले असून संशयितांचा शोध सुरू आहे.















