- सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे आणि महापौर रवी लांडगे यांची ‘गुपचूप’ खेळी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १७ जून २०२६) :- पुनावळे येथील शैक्षणिक आरक्षणाचा तब्बल ९१ गुंठ्यांचा मौल्यवान भूखंड खासगी संस्थेला देण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधकांसह अनेक सत्ताधारी नगरसेवकांचा विरोध डावलून मंजूर करण्यात आला. या निर्णयावर चर्चा सुरू असतानाच आकुर्डी आणि कासारवाडी येथील आणखी दोन महत्त्वाच्या जागा ३० वर्षांसाठी खासगी संस्थांना देण्याचा निर्णय उपसूचनेद्वारे घेण्यात आला आहे.
या दोन भुखंडाबाबत मोठे निर्णय…
आकुर्डी येथील महापालिकेच्या मालकीच्या जागेवर डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीमार्फत शैक्षणिक संस्था चालविण्यात येत आहे. या जागेचा भाडेपट्टा सन २००२ मध्ये करण्यात आला असून संस्थेच्या नावात शासनाच्या आदेशानुसार बदल होऊन डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटी असे नामांतर करण्यात आलेले आहे. तसेच, संस्थेमार्फत भाडेपट्टा पुढील ३० वर्षांच्या कालावधीसाठी नूतनीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संस्थेत विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू असून शैक्षणिक कार्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये. संस्थेच्या मागणीचा सकारात्मक विचार करून या भाडेपट्ट्याची मुदत पुढील ३० वर्षांसाठी वाढविण्यास देखील मान्यता देण्यात आली.
कासारवाडी येथील स. नं. ४३२, ४४४/२ ते ६, ४४२/३ व ४, ४५१/२, तसेच सि.स. नं. २५६६ मधील सार्वजनिक सुविधा क्षेत्र अंदाजे ८ हजार ८३१ चौरस मीटर भुखंडाबाबत सभेत उपसूचना देण्यात आली. या जागेवर अक्षरविश्व या ज्ञानसंकुलांतर्गत ग्रंथालय, डिजिटल अभ्यासिका, स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्र, मराठी साहित्य परिषद कार्यालय, मनोमय कक्ष व इतर ज्ञानाधारित सुविधा उभारण्यास यापूर्वी मान्यता दिली आहे. या सुविधांसाठी आनंदग्राम सामाजिक सेवाभावी संस्था, भोसरी यांना महापालिकेच्या नियम व अटींच्या अधीन राहून नाममात्र भाडे आकारून ३० वर्षांच्या कालावधीसाठी जागा भाडेतत्त्वावर देण्यास मान्यता देण्यात आली.
नगरसेवकांकडून वारंवार आक्षेप घेण्यात येत असतानाही सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे आणि महापौर रवी लांडगे यांनी प्रस्ताव मंजूर करून घेतला. कोट्यवधी रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेबाबत घेतलेल्या या निर्णयामुळे सत्ताधारी भाजपावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्येही नाराजी व्यक्त होत आहे.















