न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, दि. १५ जून २०२६ :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) मालकीची पुनावळे येथील सुमारे ९१ गुंठे (अंदाजे २.२५ एकर) जागा माध्यमिक शाळेसाठी आरक्षित आहे. ही जागा ३० वर्षांसाठी खासगी संस्थेला भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली होती, त्या प्रस्तावाला महापौर रवी लांडगे यांनी आज सोमवारी (दि. १५) सर्वसाधरण सभेत उपसूचनांसह मंजुरी दिली.
महापालिका मुख्यालयात झालेल्या सभेत या विषयावर सविस्तर चर्चा झाली. प्रस्तावास मंजुरी मिळाली असली तरी त्यावर नगरसदस्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्याचे पाहायला मिळाले. सभेदरम्यान काही सदस्यांनी शैक्षणिक सुविधांच्या दृष्टीने आरक्षित जागांचा योग्य वापर होणे आवश्यक असल्याचे मत मांडले, तर काहींनी भाडेपट्टा धोरणाबाबत अधिक स्पष्टता आणि पारदर्शकतेची गरज व्यक्त केली. भविष्यात शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन संबंधित जागेचा उपयोग होईल याची खात्री करण्याची मागणीही सदस्यांनी केली.
या विषयावरील चर्चेत नगरसेवक निलेश बारणे, कुणाल वाव्हळकर, राहुल कलाटे, नितीन काळजे, प्रमोद कुटे, अनंत कोऱ्हाळे, संदीप वाघेरे, प्रशांत शितोळे तसेच नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर आणि स्नेहा कलाटे यांनी सहभाग घेत विविध मुद्दे उपस्थित केले.
महापौर रवी लांडगे यांनी सदस्यांच्या सूचनांचा विचार करून उपसूचनांसह प्रस्ताव मंजूर केल्याचे जाहीर केले. या निर्णयामुळे पुनावळे परिसरातील शैक्षणिक पायाभूत सुविधांच्या नियोजनाबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.














