- इतर स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट आणि सामाजिक संस्थांना डावलले?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १६ जून २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिंचवड व पुनावळे येथील ऑक्सिजन पार्कच्या देखभालीसाठी तब्बल ५५ लाख रुपयांचे काम “नारी द वुमन” या संस्थेला थेट पद्धतीने देण्याचा प्रस्ताव बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी आहे. मात्र, निविदा प्रक्रिया न राबविता पुन्हा त्याच संस्थेला थेटपणे काम देण्याच्या हालचालीमुळे सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित होत आहेत.
चिंचवड येथील ऑक्सिजन पार्क २०२२ पासून या संस्थेकडे देखभालीसाठी आहे. त्यानंतर वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली. पुनावळे येथील ऑक्सिजन पार्कही संबंधित संस्थेकडे देण्यात आले होते. आता दोन्ही उद्यानांची देखभाल पुढील १८ महिन्यांसाठी पुन्हा त्याच संस्थेला देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, सुमारे १३ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या या उद्यानांच्या देखभालीसाठी ५५ लाख ७ हजार ७८४ रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. या कामासाठी खुली निविदा प्रक्रिया राबविण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे इतर स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट किंवा सामाजिक संस्थांचा विचार या कामासाठी का झाला नाही?. त्यांनाही समान संधी का देण्यात आली नाही?, असा प्रश्न जाणकार नागरिक उपस्थित करीत आहेत.















