न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १६ जून २०२६) :- चिंचवड परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या ३७ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका डॉक्टरला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. उपचाराच्या नावाखाली महिलेच्या शरीराला अयोग्य स्पर्श केल्याचा आरोप करण्यात आला असून, या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित महिला काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत होत्या. रविवारी पहाटे डॉक्टर वॉर्डमध्ये आले आणि उपचार प्रक्रियेचा भाग असल्याचे सांगत महिलेच्या पायाला लावलेले स्टॉकिंग तपासण्याचे कारण पुढे केले. त्यावेळी त्यांनी महिलेच्या शरीराच्या संवेदनशील भागांना अयोग्य स्पर्श केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
घडलेल्या प्रकारानंतर महिलेने नातेवाइकांना माहिती दिली. त्यानंतर निगडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत तत्काळ गुन्हा नोंदवून संबंधित डॉक्टरला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.














