- शेजाऱ्यांकडून छळ झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. १६ जून २०२६) :- चिंचवडमधील वेताळनगर परिसरात एका ४० वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली. सोमनाथ गौतम वाघमारे असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्यांच्या मृत्यूस शेजाऱ्यांकडून होत असलेल्या कथित मानसिक छळाला कारणीभूत धरत कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरातील एका व्यक्तीच्या संशयास्पद वर्तनाबाबत नियंत्रण कक्षाला माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. संबंधित व्यक्तीने स्वतःला घरात कोंडून घेतल्याने पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी सोमनाथ वाघमारे यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले. त्यांना तत्काळ खाली उतरविण्यात आले; मात्र त्यांचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घटनेमागील कारणांचा शोध घेत असताना नातेवाइकांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.















