न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २४ जुलै २०२६) :- भारत टॅक्सी मोबाईल अॅपमध्ये टू-व्हीलर टॅक्सीचा समावेश करण्यास विरोध दर्शवत महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गुरुवारी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली. यावेळी संघटनांनी भारत टॅक्सीच्या उद्घाटनावेळी ऑटो, टॅक्सी व कॅब चालक-मालक संघटनांना विश्वासात न घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त करत निवेदन सादर केले.
बैठकीत मुरलीधर मोहोळ यांनी लवकरच पुण्यात सर्व संबंधित संघटना आणि अधिकाऱ्यांची व्यापक बैठक बोलावून चालकांच्या प्रश्नांवर चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनाचे स्वागत करताना डॉ. बाबा कांबळे यांनी भारत टॅक्सी उपक्रमाला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले; मात्र अॅपमध्ये टू-व्हीलर टॅक्सीचा समावेश झाल्यास राज्यातील सुमारे ३० लाख ऑटो, टॅक्सी आणि कॅब चालकांच्या रोजगारावर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त केली.
“भारत टॅक्सीचे आम्ही स्वागत करतो, मात्र त्यात टू-व्हीलर टॅक्सीला आमचा कायम व प्रखर विरोध राहील,” अशी भूमिका डॉ. कांबळे यांनी पुन्हा स्पष्ट केली. बैठकीला विलास केमसे पाटील, अविनाश वाडेकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


















