- विद्यार्थ्यांचा छळ थांबवा, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल – शिवसेना शहराध्यक्ष चेतन पवार
- मोदी सरकारच्या विरोधात शिवसेनेचे पिंपरीत आंदोलन..
- विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शहर शिवसेना-ठाकरे पक्षाकडून जाहीर पाठिंबा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २५ जुलै २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहर शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने आज शनिवार (दि. २५) पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी तसेच केंद्र सरकारच्या भूमिकेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.

शिवसेना पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष चेतन पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात माजी आमदार गौतम चाबुकस्वार, उपजिल्हाप्रमुख रोमी संधू, शहर समन्वयक कैलास नेवासकर, शहर कार्यालय सचिव ज्ञानेश्वर शिंदे, चिंचवडचे उपशहर प्रमुख श्रीमंत गिरी, उपशहरप्रमुख भोसरी अनिल सोमवंशी, उपशहरप्रमुख पिंपरी पार्थ गुरव, जिल्हा संघटिका अनिता तुतारी, उपजिल्हा संघटिका वैभवी घोडके, कल्पना शेट्टे, चिंचवड विधानसभा समन्वयक वैशाली काटकर, जेष्ठ शिवसैनिक दिलीप सावंत, संजय जाधव, भोसरी विधानसभा समन्वयक राहुल भोसले, चिंचवड विधानसभा समन्वयक गणेश आहेर, विभागप्रमुख अॅड. दत्तात्रय साळवी, संदीप भालके, सचिन चिंचवडे, गोरख नवघणे, दिलीप दंडवते, निवृत्ती शिंदे, शिवसैनिक अमोल भालेकर, शिवदुत मोहन बारटक्के, उपविभागप्रमुख श्रीकांत चौधरी, योगेश राऊत, राजू बेद, शिवसैनिक सिध्दीक शेख, वाहतूक सेनेचे वैभव छाजेड, विभाग समन्वयक के.एम. रेड्डी, शाखाप्रमुख दिपक भक्ती, शिवाजी शेळके, योगेश ठाकरे, स्वप्नी शेवाळे, तुषार काटे, अंकुश पवार, शिवसैनिक बंडू खोसे, जितेंद्र जुनेजा, जतिन अवसरमल, नितिन अवसरमल, विद्यार्थी सेनेने राज गिरी, उपशहर संघटिका योगिनी मोहन, विभाग संघटिका बेबी सय्यद, ज्योती भालके, कलावती नाटेकर, तस्लिम शेख, उपविभाग संघटिका वंदना खंडागळे, पुनम रिठे, जेष्ठ शिवसैनिक रत्नप्रभा नवघरे, शिवसैनिक राजश्री शिखळकर, सुषमा बोरकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष चेतन पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. “सरकारची प्राथमिकता विद्यार्थ्यांच्या मागण्या समजून घेण्याची आणि त्यांच्याशी चर्चा करून योग्य मार्ग काढण्याची असायला हवी. मात्र मोदी सरकार विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून हुकूमशाही पद्धतीने वागत आहे. गेल्या वीस दिवसांपासून आंदोलन करणारे पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे लोकशाहीला काळिमा फासणारे आहे. आपण लोकशाहीत राहतो की हिटलरशाहीत, असा प्रश्न आज निर्माण झाला आहे,” असे ते म्हणाले.
जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांचे आंदोलन पोलिसी बळाचा वापर करून चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. आंदोलक विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीमार करण्यात आला. अशा दडपशाहीचा शिवसेना तीव्र निषेध करत असून सोनम वांगचुक, सीजेपीचे अभिजित दिपके आणि आंदोलन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देत असल्याची घोषणा त्यांनी केली.
चेतन पवार पुढे म्हणाले, “महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री स्व. आर. आर. (आबा) पाटील यांनी ”बडे बडे शहरों में छोटी छोटी बाते होती रेहती है” या एका वक्तव्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा दिला होता. मात्र आज देशभरात शंभरहून अधिक स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीच्या घटना घडूनही केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी साधा राजीनामाही दिलेला नाही, ही अत्यंत लज्जास्पद बाब आहे. विद्यार्थ्यांवर अन्याय करण्याचा किंवा त्यांच्या आंदोलनावर लाठीमार करण्याचा प्रयत्न झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला. तसेच या आंदोलनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वप्रथम पाठिंबा दिल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनीही केंद्र सरकारवर निशाणा साधला. “मोदी सरकारच्या कार्यकाळात नीटसह विविध स्पर्धा परीक्षांचे पेपर मोठ्या प्रमाणात फुटले आहेत. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात गेले असून अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. या घटनांमुळे अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या गंभीर प्रश्नाला सोनम वांगचुक यांनी वाचा फोडली. मात्र विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याऐवजी सरकार समाजात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या मुद्द्यांना प्राधान्य देत आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची धग आता महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू आणि देशभर पसरली असून या जनआक्रोशाची जबाबदारी केंद्र सरकारने स्वीकारावी,” असे त्यांनी सांगितले.
आंदोलनाच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांची तातडीने दखल घेऊन केंद्र सरकारने संवाद साधावा, पेपरफुटीच्या घटनांवर कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरील दडपशाही थांबवावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.


















