न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू (दि. २५ जुलै २०२६) :- आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्रीक्षेत्र देहू येथील सृजन फाऊंडेशन संचलित अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल येथे पारंपरिक अभंग वारीचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. या वारीत नर्सरी, एलकेजी, यूकेजी तसेच इयत्ता पहिली, दुसरी आणि तिसरीतील विद्यार्थ्यांनी मोठ्या भक्तिभावाने सहभाग नोंदविला.
बालवारकऱ्यांनी भगवान विठ्ठल, माता रुक्मिणी तसेच संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई आणि संत एकनाथ यांचे वेष परिधान करून वारीची परंपरा जिवंत केली. टाळ-मृदुंगाच्या गजरात, “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात आणि विठूनामाच्या अखंड गजरात संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.
पूर्व प्राथमिक विभागातील चिमुकल्यांनी टाळांच्या तालावर फुगड्यांचा फेर धरत विठ्ठलनामात रंग भरला, तर प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी संतांच्या दिंड्या, पालखी सोहळा आणि रिंगण साकारून वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा अनुभवली. “आम्ही पालखीचे भोई” म्हणत विद्यार्थ्यांनी पालखी खांद्यावर घेत भक्तीचा अनोखा आविष्कार घडविला. काही विद्यार्थ्यांनी सुमधुर अभंग सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
रिमझिम पावसाची पर्वा न करता विद्यार्थ्यांनी विठ्ठलाच्या सावळ्या, गोजिऱ्या रूपाचे दर्शन घेत आषाढी एकादशीचा आनंद उत्साहात साजरा केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वारकरी संप्रदायाची संस्कृती, संतपरंपरेची ओळख आणि भक्तीभावाची जपणूक करण्याचा संदेश प्रभावीपणे पोहोचला.
यावेळी शाळेच्या उपप्राचार्या शैलजा स्वामी, पूर्व प्राथमिक विभागाच्या समन्वयक शुभलक्ष्मी पाठक तसेच शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

















